आयसीसी टी20 वर्ल्डकपची धमाकेदार सुरुवात झाली आहे. पहिला सामना यजमान अमेरिका आणि कॅनडा संघात खेळला गेला. यात यजमान संघाने 7 विकेट्सनी विजय मिळवला. डलासच्या ग्रँड प्रेयरी मैदानात झालेल्या या सामन्यात कॅनडाने अमेरिका समोर विजयासाठी 195 धावांचे आव्हान ठेवले होते. हे आव्हान लीलया पार करत अमेरिकेनं 17.4 षटकात 197 धावा करत विजय मिळवला.
आरोन जोन्स अमेरिकेच्या विजयाचा नायक ठरला. त्याने तुफानी खेळी करत कॅनडाच्या गोलंदाजांची धुलाई केली. आरोन जोन्स याने 40 चेंडूत नाबाद 94 धावा केल्या. या त्याच्या 4 चौकारांचा आणि 10 उत्तुंग षटकारांचा समावेश आहे. जोन्स आणि एंड्रीज गौस या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी 131 धावांनी भागीदारी करत संघाला विजयी केले. अमेरिकेच्या टी20 क्रिकेट इतिहासातील ही सर्वात मोठी भागीदारी ठरली. गौस याने 7 चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 65 धावा केल्या.
जोन्सची खास क्लबमध्ये एन्ट्री
आरोन जोन्स याची खास क्लबमध्ये एन्ट्री झाली आहे. टी20 वर्ल्डकपच्या एका सामन्यात 10 षटकार ठोकण्याचा कारनामा करणारा जोन्स वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलनंतर दुसरा खेळाडू ठरला.
पहिल्यांदा 190 हून अधिक धावांचा यशस्वी पाठलाग
दरम्यान, आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये अमेरिकेने पहिल्यांदाच 190 हून अधिक धावांचा यशस्वी पाठलाग केला. पहिल्या 8 षटकात अमेरिकेने 2 विकेट्स गमावून 48 धावा केल्या, मात्र पुढील 9.4 षटकात जोन्सचे वादळ मैदानात घोंगवले आणि अमेरिकेने 149 धावा चोपत सामना खिशात टाकला.