हिंदुस्थानी महिलांची दक्षिण आफ्रिकेवर मात, सराव सामन्यात विजयरंग

हिंदुस्थानी महिला संघाने आगामी महिला टी-20 वर्ल्ड कपच्या तयारीसाठी सुरू असलेल्या सराव सामन्यात दक्षिण आफ्रिकन संघाचा 28 धावांनी पराभव करत आपण तयार असल्याचे दाखवून दिले.

हिंदुस्थानी संघाने सराव सामन्यात निराशाजनक सुरूवात झाल्यानंतरही रिचा घोष आणि दीप्ती शर्माच्या तडाखेबंद खेळीच्या जोरावर 20 षटकांत 7 बाद 144 अशी मजल मारली होती. स्मृती मानधना 21 धावांवर बाद झाली, हरमनप्रीत कौरही 10 धावाच करू शकली. मात्र त्यानंतर जेमीमा रॉड्रिग्ज (30), रिचा घोष (36) आणि दिप्ती शर्मा (ना. 35) यांच्या खेळामुळे हिंदुस्थानला 144 पर्यंत मजल मारता आली. हिंदुस्थानच्या 145 धावांचा पाठलाग करताना लॉरा वॉलवार्ड्ट आणि तझमिन ब्रिट्सने 37 धावांची सलामी दिली, पण त्यानंतर आशा शोबनाने दोन विकेट घेत आफ्रिकन डावाला हादरवले. त्यामुळे हिंदुस्थानने सामन्यावर आपली पकड मजबूत केली होती. क्लो ट्रायन (24) आणि अॅनी डर्कसन (ना.21) यांनी संघाची धावगती वाढवण्याचा प्रयत्न केला, पण हिंदुस्थानी महिलांनी अचूक मारा करत आफ्रिकन संघाला विजयापासून खूप दूर नेले. परिणामता त्यांचा संघ 20 षटकांत 6बाद 116 धावांपर्यंतच मजल मारू शकला आणि हिंदुस्थानने सराव सामना 28 धावांनी जिंकला. कालही आपल्या महिलांनी विंडीज संघाचा 20 धावांनी पराभव केला होता. आता गुरूवारपासून वर्ल्ड कपला सुरूवात होत असून हिंदुस्थानचा सलामीचा सामना 4 ऑक्टोबरला न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे.