अवघ्या अफगाणिस्तानचे डोळे पाणावले

गेले पाच दिवस अफगाणिस्तानमध्ये सुरू असलेला जश्न अखेर थांबला. टी-20 वर्ल्ड कपमध्ये अफलातून कामगिरी करणाऱया अफगाणिस्तानचा स्वप्नभंग करणारा शेवट पाहून अवघ्या अफगाणिस्तानचे डोळे पाणावले; पण आपल्या संघाच्या जबरदस्त कामगिरीचे कौतुकही त्यांच्या चेहऱयावर दिसत होते.

अफगाणिस्तानसाठी यंदाचा टी-20 वर्ल्ड कप अभूतपूर्व ठरला. साखळीत न्यूझीलंड आणि सुपर एटमध्ये ऑस्ट्रेलियासारख्या जगज्जेत्या संघाला धूळ चारल्यानंतर क्रिकेट जगतात अफगाणिस्तानची कॉलर टाइट झाली होती. त्यांच्यासाठी ऑस्ट्रेलियाला हरवणेच वर्ल्ड कप जिंकल्यासारखे होते. त्यामुळे अफगाणिस्तान या विजयानंतर सुरू झालेला जल्लोष थांबायचे नावच घेत नव्हता. बांगलादेशविरुद्ध विजय नोंदवल्यानंतर लाखोच्या संख्येने अफगाणी काबूलच्या रस्त्यांवर उतरले होते. अफगाणिस्तानमध्ये जल्लोषाचे आणि आनंदाचे वातावरण पसरले होते.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धही अफगाणिस्तान संघांकडून त्याच करिष्म्याची अपेक्षा होती. अंतिम फेरीत पोहोचल्याचा जश्न साजरा करण्याची तयारी अवघ्या देशाने केली होती. अफगाणिस्तानच्या काबूल येथील क्रिकेट मैदानात तालिबानच्या सुरक्षा व्यवस्थेत मोठय़ा स्क्रीनवर उपांत्य सामना पाहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. त्यासाठी हजारो क्रिकेटचाहत्यांनीही गर्दी केली होती. विशेष म्हणजे, अफगाणिस्तानच्या वेळेनुसार पहाटे पाच वाजता सुरू होणार असल्यामुळे अवघे काबूल झोपलेच नव्हते. मोठय़ा जल्लोषमय वातावरणात सामन्याला सुरुवात झाली खरी, पण पहिल्या षटकात गुरबाजची विकेट पडताच अफगाणी चाहत्यांच्या हृदयाचे ठोकेच चुकले. त्यानंतर वारंवार बसणाऱया धक्क्यानंतरही आपला संघ सामन्यात कमबॅक करेल या आशेने शेकडो चाहते सामना पाहत होते. पण आजचा दिवस अपेक्षाभंगाचाच होता. कोसळलेल्या अफगाणिस्तानला आज कुणीही सावरू शकला नाही. संघांची अनपेक्षित कामगिरी पाहून सर्वांनाच दुःखद धक्का बसला. पण संघाचा पराभव स्पष्ट झाल्यावर ते आपल्या आसवांनाही रोखू शकले नाहीत. गेले पाच दिवस सुरू असलेल्या जश्नचा माहौल मातममध्ये बदलला. पण पराभवानंतर साऱयांनी आपल्या संघाच्या अद्वितीय कामगिरीचे कौतुक करत त्यांना भावी क्रिकेटसाठी शुभेच्छाही दिल्या.