रोहित म्हणजे मर्यादापुरुषोत्तम, जगज्जेता कर्णधार कपिल देवकडून कौतुकाचा वर्षाव

रोहित शर्मा विराट कोहलीसारखा खेळत नाही. त्याच्यासारख्या उडय़ा मारत नाही. तो आपल्या मर्यादा ओळखून आहे. मर्यादेत राहूनही तो सर्वोत्तम आहे. त्याच्यापेक्षा सरस कुणी नाही, असे कौतुकोद्गार काढलेत हिंदुस्थानचा माजी जगज्जेता कर्णधार कपिल देव यांनी.

टी-20 वर्ल्ड कपच्या अखेरच्या सुपर एट सामन्यात रोहित शर्माची बेधुंद खेळी पाहून सारेच त्याच्या प्रेमात पडले आहेत आणि सारेच त्याचे गुणगान गात आहेत. यात आता कपिल देव यांचेही नाव जोडले गेले आहे. हिंदुस्थानने अनेक मोठे खेळाडू आहेत, पण ते स्वतःसाठी खेळले आहेत. नेतृत्व पण स्वतःसाठी करतात. पण रोहित यांच्यापेक्षा एक पाऊल पुढे आहे. जो पूर्ण संघाला आपल्या सोबत घेऊन जाणारा माणूस आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली दोघेही भिन्न खेळाडू आहेत. दोघांचा खेळही वेगळा असल्याचेही सांगितले.

पुढे कपिल म्हणाला, दोघांनी देशासाठी 45 हजारांपेक्षा अधिक धावा केल्या आहेत आणि दोघेही देशाची शान आहेत. हा वर्ल्ड कप जिंकून देण्याची जबाबदारी दोघांनी आपल्या खांद्यावर घेतलीय. दोघांमध्ये अद्याप चांगली सलामी झाली नसली तरी दोघांच्या उपस्थितीनेही संघावर प्रभाव पडतोय. दोघांचा खेळण्याचा ढंग वेगळाय. रंग वेगळाय. अंदाज वेगळाय आणि दोघेही मॅचविनर असल्याचेही कपिल म्हणाला.