सूर तेच छेडिता

‘संगीत क्षेत्राचा पॅनव्हास खूप मोठा आहे. तुम्हाला सातत्याने नवीन गोष्टी करता यायला हव्यात. म्हणूनच वाद्य वादनापुरते मर्यादित न राहता अजून आपण संगीत संयोजन, म्युझिक प्रोग्रामिंग करणे तसेच संगीतकार होणे या गोष्टींकडेदेखील नीट लक्ष दिले पाहिजे. संगीत क्षेत्रात मेहनतीला पर्याय नाही.’, सांगत आहेत सिंथेसायझर वादक प्रशांत लळित.

एखादा मराठी किंवा हिंदी वाद्यवृंद असेल किंवा टीव्हीवरील एखादा संगीतमय कार्यक्रम, एखाद्या प्रसिद्ध गायकाची मैफल असेल, तर अशा अनेक समारंभांतून, कार्यक्रमांतून गेली सत्तावीस वर्षे सिंथेसायझर वाजवणारा एक अतिशय उत्तम गुणी कलावंत तुम्ही पाहिला असेल. तो कलावंत म्हणजे प्रशांत लळित. प्रशांत मूळचा गिरगावकर. त्याच्या वडिलांचा वाद्यवृंद होता. त्याला गाणी गुणगुणायला आवडत होते, पण आपण एखादे वाद्य वाजवू किंवा त्यात करीअर करू असे त्याला वाटले नव्हते. दहावीच्या सुट्टीत प्रशांत एकदा त्याच्या आजोबांकडे (आईचे वडील ) गेला होता. ते पेटी वाजवायचे. आजोबा आता आपल्याला पेटी देतील का, असे प्रशांतने विचारले आणि आजोबांनी त्याला होकार दिला. ती पेटी त्याने घरी आणली आणि मग पेटी वादनाची त्याला आवड निर्माण होऊ लागली. प्रशांत म्हणतो, ‘‘गिरगावातील आशुतोष दाबके या माझ्या मित्राने त्याच्या वाद्यवृंदात पेटी वाजवायला येशील का, असे विचारले आणि मग मी कार्यक्रमातून पेटी वाजवू लागलो. त्या काळात सिंथेसायजर या वाद्याचीदेखील मला आवड निर्माण झाली आणि मग मी वडिलांना आपण सिंथेसायजर घेऊ या का, असे विचारले. तेव्हा मी विल्सन कॉलेजमध्ये पदवीच्या शेवटच्या वर्षाला होतो. मी पदवीधर झालो, आम्ही कीबोर्ड घेतला आणि मग मी शामकांत परांजपे यांच्याकडे नोटेशन शिकलो. संगीत क्षेत्रातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व अप्पा वढावकर यांच्या कार्यक्रमातून मी सिंथेसायजर वादन करू लागलो.’’

मग प्रशांत लळित या नावाला एक ओळख मिळत गेली. सुप्रसिद्ध गायक रवींद्र साठे, संगीतकार श्रीधर फडके, संगीतकार अशोक पत्की, संगीतकार यशवंत देव, सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले, पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर, उत्तरा केळकर अशा अनेक मान्यवरांच्या कार्यक्रमांतून प्रशांत सिंथेसायझर वादन करू लागला. दरम्यान गाण्यांच्या कार्यक्रमातून मराठी गाण्यांप्रमाणेच हिंदी गाणीदेखील असावीत, असा एक कल निर्माण होऊ लागला. त्यामुळे प्रशांत सिंथेसायजरवर हिंदी गाणीदेखील वाजवू लागला. हळूहळू सिंथेसायजर वादनाप्रमाणे प्रशांत हा पूर्ण कार्यक्रमाचे संगीत संयोजन, म्युझिक प्रोग्रामिंगदेखील करू लागला. प्रशांत म्हणतो, ‘‘या क्षेत्रात वयाचे बंधन नाही. तुम्ही सतत रियाज मात्र करायला हवा. तसेच नुसते वाद्य वादनापुरते मर्यादित न राहता अजून आपण संगीत संयोजन, म्युझिक प्रोग्रामिंग करणे तसेच संगीतकार होणे या गोष्टींकडेदेखील करीअर करताना नीट लक्ष दिले पाहिजे. संगीत क्षेत्राचा पॅनव्हास खूप मोठा आहे. तुम्हाला सातत्याने नवीन गोष्टी करता यायला हव्यात.’’

टीव्ही माध्यमाचा प्रशांतचा अनुभवसुद्धा खूप मोठा आहे. ‘सह्याद्री अंताक्षरी’, सह्याद्री वाहिनीवरील ‘म्युझिक मस्ती गप्पा गाणी’, अल्फा मराठी असताना तेव्हाचे ‘सा रे ग म’, सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मी होणार सुपरस्टार’ अशा अनेक कार्यक्रमांत आपण प्रशांतला वादक म्हणून पाहिले आहे. दोहा कतार, अमेरिका, युरोप असे परदेश दौरेदेखील त्याने अनेक नामवंत गायक-गायिकांच्या कार्यक्रमांसाठी केले आहेत. स्वप्नील बांदोडकर, मिलिंद इंगळे, शंकर महादेवन, जयदीप बगवाडकर, वैशाली सामंत अशा अनेक नामवंत गायक-गायिकांच्या कार्यक्रमांतून प्रशांतची कला प्रेक्षकांपर्यंत पोहोचली आहे. गेल्या सत्तावीस वर्षांत प्रशांतने पाच हजारांहून अधिक कार्यक्रमांत आपली कला सादर केली आहे. सागरिका म्युझिक, टी सीरिज, एच एम व्ही म्युझिक अशा नामवंत म्युझिक पंपन्यांच्या अल्बमसाठीदेखील प्रशांतने काम केले आहे. संगीत संयोजन क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्याला ‘नृत्यकला निकेतन’ या संस्थेतर्फे सन्मानित करण्यात आले आहे. अशी सुरांशी दोस्ती करणारा प्रशांत हा खरोखरच एक गुणी कलावंत आहे.
शब्दांकन – गणेश आचवल