जलतरण तलावात पोहणे शिकण्यासाठी जाणे पंधरा वर्षीय मुलाच्या जीवावर बेतले असून, स्विमिंग पूल संचालकाच्या बेजबाबदारपणामुळे जलतरण तलावात स्विमिंग पूल मध्ये या मुलाचा बुडून मृत्यू झाला आहे. वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट शहरात असलेल्या मोहता स्विमिंग पूल मध्ये आज सायंकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान ही दुर्दैवी घटना घडली आहे.
या मोहता स्विमिंग पूलमध्ये बुडून मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव रेहान मेहनउद्दीन चौधरी (वय 15 राहणार मुजुमदार वार्ड हिंगणघाट) असे आहे. हिंगणघाट शहरातील मुजुमदार वार्डमध्ये मागील तीन वर्षांपासून चौधरी कुटुंब उत्तर प्रदेश येथून राहण्यासाठी आले असून मृत मुलाच्या वडिलांचा बेकरीचा व्यवसाय आहे. नवव्या वर्गात शिकणारा रेहान हा आज आपल्या आईसोबत स्विमिंग करण्यासाठी म्हणून मोहता स्विमिंग पूलमध्ये गेला होता. आज स्विमिंग पूलमध्ये आपल्या पहिल्या दिवशी पैसे भरून रेहानने स्विमिंग पूल मध्ये उडी टाकली. या स्विमिंग पूलमध्ये असलेले पाणी हे हिरव्या रंगाचे झाले असून पूर्णपणे दूषित पाणी साचलेला हा पूल असल्याने त्यामध्ये पोहण्यासाठी गेलेला रिहान हा पाण्यात दिसेनासा झाला. दहा मिनिटे होऊनही मुलगा दिसत नसल्याने रेहानच्या आईने आरडाओरडा सुरू केल्यानंतर स्विमिंग पूल मध्य बुडालेल्या रेहानला बाहेर काढण्यात आले. रेहानला बाहेर काढून लगेच स्कुटीवर बसवीत डॉक्टर सिंघवी यांच्या दवाखान्यात नेण्यात आले. यानंतर त्याला हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठवले. हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी रेहानला यावेळी मृत घोषित केले. रेहानच्या या मृत्यूची माहिती मिळताच हिंगणघाट शहरातील अनेकांनी उपजिल्हा रुग्णालयात एकच गर्दी केली होती. हिंगणघाट शहरात या घटनेनंतर हळहळ व्यक्त केली जात आहे. हिंगणघाट शहरातील वातावरण संवेदनशील झाले असून पोलिसांकडून हिंगणघाट शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टिकोनातून उपाययोजना आखल्या जात आहेत. हिंगणघाट शहरातील नागरिकांकडून आता या जलतरण तलावाच्या संचालकाविरोधात गुन्हा नोंदवण्याची मागणी केली जात असून हिंगणघाट पोलिसांकडून पुढील तपास कार्य सुरू आहे.