मनोगत – इतिहासात  दडलेली रत्ने

>>लता गुठे

देहापासून देवाकडे जाताना मध्ये एक देश लागतो आणि त्या देशाचं आपण देणं लागतो.’ स्वातंत्र्यवीर सावरकरांचे वरील विचार वाचून माझी सामाजिक जबाबदारी समजून मी गेली सात वर्षं सातत्याने क्रांती लढय़ातील शहीद क्रांतिवीरांवर पुस्तकं प्रकाशित करत आहे. यामागचं कारण असं होतं की, जे स्वातंत्र्य आपण उपभोगत आहोत, त्यामागे किती क्रांतिवीरांनी रक्त सांडलं, किती जणांना आपले जीव गमवावे लागले, किती जणांनी घरादारांवर तुळशीपत्र ठेवून स्वातंत्र्य संग्रामाच्या अग्निकुंडामध्ये स्वतच्या प्राणाच्या समिधा अर्पण केल्या. आपण जे स्वातंत्र्य उपभोगत आहोत ते आपल्याला सहजासहजी मिळालेलं नाही, तर ते मिळालं आहे क्रांतिवीरांनी दिलेल्या लढय़ामुळे. महिलांच्या योगदानाचा उल्लेख केल्याशिवाय हिंदुस्थानी संघर्षाचा इतिहास पूर्ण होऊ शकणार नाही. या लढय़ामध्ये क्रांतिवीरांच्या खांद्याला खांदा लावून लढणाऱ्या असंख्य महिला होत्या, राजघराण्यातील राण्या होत्या तशाच सर्वसामान्य घरातल्या महिलाही होत्या. त्यांनी जिवाची पर्वा न करता क्रांती लढा पुढे नेला. सर्व सुखाचा त्याग करून फक्त भारतमातेला पारतंत्र्यातून मुक्त करण्यासाठी ध्यास घेतला. ब्रिटिशांविरुद्ध लढा देऊन झाशीच्या राणीने अनेक वर्षं झाशीचे रक्षण केलं. त्याही आधी म्हणजे 1857 च्या उठावाच्या आधी 1824 मध्ये कित्तूरची राणी चन्नम्मा या राणीने कित्येक वर्षं ब्रिटिशांविरुद्ध लढा देऊन आपलं राज्य वाचवलं. जेव्हा झाशीच्या राणीबद्दलची माहिती वाचायला लागले त्या वेळेला झाशीला सुरक्षित ठेवणारी आणि झाशीच्या जागेवर लढून शहीद झालेली झलकारीबाई मला जास्त भावली. विदेशात पहिला तिरंगा झेंडा फडकवणाऱ्या मादाम कामा, ज्यांनी परदेशात राहून क्रांतिवीरांना मदत केली. पहिले गुप्त रेडिओ केंद्र चालविणाऱ्या उषा मेहता, प्राणाची आहुती देणाऱ्या वीरांगना उदादेवी पाशी अशा विविध राज्यांतील 13 कर्तबगार महिलांचा या पुस्तकात समावेश आहे.

त्यांच्याविषयी लिहिताना, वाचताना मी अनेकदा हळवी झाले. आजच्या पिढीला याबद्दल माहिती होईल, प्रेरणा मिळेल, स्त्राr शक्ती काय असते याची जाणीव होईल या उद्देशाने हे पुस्तक आपल्यासमोर ठेवत आहे. इतिहासाच्या पुस्तकात दडलेल्या या महिलांना प्रकाशात आणण्याचा हा प्रयत्न वाचकांना निश्चित आवडेल.

स्वातंत्र्यसंग्रामातील वीरांगना

n लेखिका लता गुठे

n प्रकाशक भरारी प्रकाशन n मूल्य रु. 150