शास्त्रीय संगीतप्रेमींना पर्वणी

नवी दिल्लीत रंगणार स्वामी हरिदास तानसेन संगीत नृत्य महोत्सव हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत आणि नृत्य यांचा सुंदर मिलाफ असलेला स्वामी हरिदास तानसेन संगीत नृत्य महोत्सव पुन्हा आलाय. अनेक शिष्यांमध्ये संगीत प्रतिभेचे बीज रोवणाऱया महान गुरूंप्रति आदर व्यक्त करणारा हा महोत्सव आहे. यंदा हा महोत्सव 2 ते 4 फेब्रुवारीदरम्यान सर शंकरलाल हॉल, मॉर्डन स्कूल बाराखंबा रोड, नवी दिल्ली येथे सायंकाळी 6 वाजता रंगणार आहे. याअंतर्गत रसिकांना प्रतिभावंताच्या कलेचा आस्वाद घेता येणार आहे.

प्रसिद्ध कथक नृत्यांगना उमा शंकर यांच्या संकल्पनेतून स्वामी हरिदास तानसेन संगीत नृत्य महोत्सवाचे आयोजन होते. महोत्सवाच्या पहिल्या दिवशी म्हणजे 2 फेब्रुवारी रोजी जयपूर अत्रोली घराण्याच्या प्रसिद्ध गायिका अश्विनी भिडे यांचे गायन होईल. पंडित तेजेंद्र नारायण मुजूमदार यांचे सरोदवादन आणि परवीन सुलताना यांचे गायन होईल.

3 फेब्रुवारी रोजी पंडित विश्वमोहन भट (मोहन वीणा) आणि पंडित सलील भट (सात्त्विक वीणा) यांचे सादरीकरण होईल. त्याच दिवशी पंडित वेंकटेश कुमार यांचे गायन आणि पंडित हरिप्रसाद चौरसिया यांचे सुमधुर बासरीवादन याचा आनंद रसिकांना घेता येईल.

समारोपाच्या दिवशी डॉ. उमा शंकर आणि त्यांच्या शिष्यांचे कथ्थक नृत्य पाहता येईल. उस्ताद सुजात खान यांचे सतारवादन आणि पंडित उल्हास कशाळकर यांच्या गायनाची पर्वणी मिळेल.