पाकिस्तानच्या सीमेवर नापाक हालचाली; सीडीएस जनरल अनिल चौहान यांच्या विधानाने वाढवली चिंता

जम्मू-कश्मीरमध्ये पाकिस्तानच्या नापाक कुरापती सुरूच असल्याचे समोर आले आहे. हिंदुस्थान-पाकिस्तान सीमेवर पीर पंजाल भागात अचानक तणाव वाढला आहे. तर दुसरीकडे बांगलादेशात सुरू असलेल्या हिंसाचाराने चिंता आणखी वाढवली आहे, असे विधान सीडीएस अर्थात चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ अनिल चौहान यांनी केले आहे. बांगलादेशात सुरू असलेला हिंसाचार आणि राजकीय उलथापालथ यांमुळे शेजारील देशांच्या सीमेवर चिंतेचे वातावरण असल्याचे सीडीएस जनरल यांनी म्हटले आहे. दरम्यान, कश्मीरमधील दहशतवादी हल्ले आणि बांगलादेशातील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर सीडीएस जनरल अनिल चौहान यांचे विधान अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.

दुसऱ्या महायुद्धानंतर संपूर्ण जग मोठय़ा भयंकर आणि घातक स्थितीतून जात आहे, असे सीडीएस जनरल चौहान यांनी म्हटले आहे. दिल्लीत सैन्याशी संबंधित आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. हिंदुस्थानसमोर सुरक्षेची प्रचंड आव्हाने आहेत. आपल्या शेजारी देशात निर्माण झालेल्या अस्थिरतेमुळे चिंतेचे वातावरण असून हिंदुस्थानसारख्या मोठय़ा देशाला सुरक्षेसंबंधी अनेक समस्या आहेत. यामुळे हिंदुस्थानला युद्ध शस्त्रास्त्रांसाठी परदेशातील आयातीवर अवलंबून राहून चालणार नाही. विशेषकरून जागतिक सुरक्षा आणि कायम अस्थिर स्थितीचा सामना सरकार करत आहे, याकडे सीडीएस अनिल चौहान यांनी लक्ष वेधले.

जम्मू-कश्मीरमध्ये  पाकिस्तानचे प्रॉक्सी वॉर

हिंदुस्थानसमोर सुरक्षेशी निगडित अनेक आव्हाने आहेत. पाकिस्तानने जम्मू-कश्मीरमध्ये प्रॉक्सी वॉर म्हणजेच छुपे युद्ध छेडलेले असल्याने आधीपासूनच आपण त्याचा सामना करत आहोत. यात आता अचानक पीर पंजाल रेंजची भर पडली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. चीनशी दीर्घकाळापासून असलेला सीमावाद अजूनही कायम आहे, असेही सीडीएस चौहान म्हणाले.

भू-राजकीय वातावरणात चढउतार

देशाच्या चारही बाजूला पाहिले तर लक्षात येते की, जग मोठय़ा संकटातून जात आहे. जगभरातील भू-राजकीय वातावरणात अनेक चढउतार होत आहेत. हे लक्षात घेतले तर मला वाटते की, आपण जागतिक समस्यांचा, संकटाचा सामना करत आहोत. दोन मोठी युद्ध सुरू असून हे सर्व अत्यंत चिंताजनक आहे, असेही अनिल चौहान म्हणाले. दरम्यान, सध्या लिबिया, सीरिया, येमेन आणि आर्मेनिया सध्या शांत असले तरीही जग दुसऱ्या महायुद्धानंतर सर्वात मोठय़ा हिंसक घडामोडींमधून जात आहे, असेही त्यांनी सांगितले.