केशवराव भोसले नाट्यगृहाच्या आगीमागे संशयाचा धूर!

लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी रोमच्या धर्तीवर कोल्हापुरात उभारलेले संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह गुरुवारी (8 रोजी) रात्री आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. शहराचे वैभव असलेली ही ऐतिहासिक वास्तू बेचिराख झाल्याचे पाहून कोल्हापूरकर हळहळले. या घटनेने कलानगरी सुन्न झाली असून, अनेक कलाकार, नाट्यगृहात कलेची सेवा करणारे तंत्रज्ञ, कर्मचाऱ्यांना अश्रू अनावर झाले. दरम्यान, ही आग नेमकी कशामुळे लागली, हे 24 तासांनंतरही महापालिका व जिल्हा प्रशासनाने सांगितलेले नाही. शॉर्टसर्किटमुळे आग लागली नसल्याचे महावितरणचे म्हणणे आहे. तर, नाट्यगृहाच्या बाजूस नेहमीच वावर असलेल्या नशेडी-मद्यपींकडून ही आग लागली का? हेही स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे या आगीमागे संशयाचा धूर कायम आहे.

कला-क्रीडाक्षेत्रास राजाश्रय देणारे लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी खासबाग कुस्ती मैदान आणि पॅलेस थिएटर उभारले होते. या थिएटरची ओळख नंतर ‘संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह’ अशी झाली. अवघ्या महाराष्ट्रातील लहान-मोठ्या नाट्य कलावंतांसाठी या नाट्यगृहाचे विशेष स्थान होते. मात्र, गुरुवारी रात्री साडेनऊच्या सुमारास खासबाग कुस्ती मैदानाला आग लागली आणि काही मिनिटांत शेजारील केशवराव भोसले नाट्यगृह जळून खाक झाली. विशेष म्हणजे, आज संगीतसूर्य केशवराव भोसले यांची 134वी जयंती आहे. जयंतीदिनाच्या पूर्वसंध्येलाच हा ऐतिहासिक वारसा भस्मसात झाला. दरम्यान, महापालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांनी या आगीची चौकशी करण्यासाठी चौकशी समिती गठित केली आहे.

आमचं सरकार हे नाट्यगृह पुन्हा उभे करेल -आदित्य ठाकरे

‘कोल्हापुरातील नाट्य चळवळीचे पेंद्रस्थान असलेले, प्रचंड मोठी सांस्कृतिक आणि ऐतिहासिक परंपरा लाभलेले ‘संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह’ गुरुवारी रात्री आगीच्या भक्ष्यस्थानी पडले, ही दुःखद घटना आहे,’ अशी भावना शिवसेना नेते-युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी ‘एक्स’द्वारे व्यक्त केली. ‘ऐतिहासिक वारसा असलेल्या अनेक मौल्यवान गोष्टी या आगीत भस्मसात झाल्याची शक्यता आहे. कोल्हापूरकर रसिकांसाठी ही धक्कादायक घटना आहे. शासनाने आगीची सखोल चौकशी करावी आणि हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कारवाई व्हावी,’ अशी मागणीही त्यांनी केली. ‘मी कोल्हापूरकरांना आश्वस्त करतो की, काही महिन्यांतच येणारे आमचे सरकार ‘केशवराव भोसले नाट्यगृह’ पुन्हा दिमाखदारपणे उभे करेल. कोल्हापूरचा वारसा जपेल,’ असेही आदित्य ठाकरे यांनी सांगितले.