मिंध्यांना महाडमध्ये चवदार तळ्याचे पाणी पाजणार! सुषमा अंधारे यांचा इशारा

मिध्यांकडून महाडमध्ये गुंडगिरी सुरू आहे. त्यांच्या गुंडगिरीला येत्या विधानसभेत मतदार जागा दाखवतील. महाडच्या गद्दार आमदाराला येत्या विधानसभेमध्ये चवदार तळ्याचे पाणी पाजल्याशिवाय मतदार शांत बसणार नाहीत, असा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी दिला.

महाड-पोलादपूर-माणगाव तालुक्यातील पुणेवासीय शिवसैनिक, युवासैनिक, महिला व आघाडी यांचा स्नेहमेळावा संपन्न झाला, यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी शिवसेना उपनेते शशिकांत सुतार, उपनेते आणि भारतीय म कामगार सेनेचे सरचिटणीस डॉ. रघुनाथ कुचिक, सहसंपर्कप्रमुख आदित्य शिरोडकर, महाडच्या माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप, माजी आमदार महादेव बाबर, शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, माजी गटनेते पृथ्वीराज सुतार, शहर संघटिका सविता मते, पल्लवी जावळे, कविता आंब्रे, अजित दरेकर, रायगड जिल्ह्याचे प्रवक्ते धनंजय देशमुख आदी उपस्थित होते.

सुषमा अंधारे म्हणाल्या, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या डोक्यात सत्तेची हवा होती. त्यामुळे राज्यात वाट्टेल ते करत सुटले. जेव्हा लोकसभेत लाडक्या बहिणींनी दणका दिला, तेव्हा सरकारला लाडक्या बहिणींची आठवण झाली. शिंदे, फडणवीस असेपर्यंत महिला सुरक्षेचा प्रश्न
गंभीर होणार आहे, असे त्या म्हणाल्या.

शशिकांत सुतार म्हणाले, कोकणातील जनतेने शिवसेना वाढवली, जोपासली. त्यांच्या अफाट प्रेमामुळे शिवसेना राज्यभर पोहोचली आहे. डॉ. रघुनाथ कुचिक म्हणाले, कामगारांच्या न्याय हक्कासाठी शिवसेना पाठीशी आहे. महायुती सरकारच्या काळात कंत्राटी कामगार करण्यावर भर दिला आहे. त्यामुळे कामगारांचे शोषण होत आहे.

आदित्य शिरोडकर म्हणाले, महाडवासीय पुणेकरांचे प्रश्न सोडविण्यासाठी शिवसेना कटिबध आहे. विकासाच्या केवळ घोषणा न करता, मतदारसंघातील प्रश्न सोडविण्यासाठी स्नेहल जगताप यांना संधी द्या, असे आवाहन केले.

गद्दारांना धडा शिकवा – स्नेहल जगताप

महाड-पोलादपूर-माणगाव विधानसभा मतदारसंघात गेल्या 15 वर्षांपासून विकास न होता, भकास होत आहे. कमिशनच्या माध्यमातून कंत्राटदार, कामगार यांची लूट आमदार भरत गोगावले करीत आहेत. त्यांना धडा शिकवण्याची वेळ आली आहे. नगराध्यक्ष म्हणून काम करताना जनतेची सेवा आणि महाड शहर सुधारण्याचे काम मी प्रामाणिकपणे केले आहे. यामुळे गुंडगिरी, मुजोर आणि दडपशाही करणाऱ्या गद्दरांना त्यांची जागा दाखवा, असे आवाहन उमेदवार स्नेहल जगताप यांनी मतदारांना केले.