पुणे जिल्ह्यात ताज्या सर्वेक्षणात 72 बालके तीव्र कुपोषित, 552 कुपोषित बालकांना ग्राम बालविकास केंद्रात भरती करणार

पुणे जिल्हा परिषदेच्या महिला आणि बालविकास विभागाकडे गेल्या महिन्यात जिल्ह्यात सर्वेक्षण करून तब्बल 551 कुपोषित बालकांचा शोध घेतला. यामध्ये 72 बालके ही तीव्र कुपोषित असल्याचे समोर आले आहे. या सर्व बालकांना ग्राम बालविकास केंद्रांमध्ये भरती केले जाणार आहे. सर्वाधिक 102 बालके इंदापूर तालुक्यात असून, त्यातील 13 तीव्र कुपोषित आहेत.

जिल्ह्याच्या ग्रामीण क्षेत्रांमध्ये कुपोषित बालकांचा शोध घेण्यासाठी सर्वेक्षण केले गेले . त्यामध्ये 551 कुपोषित बालके आढळून आली. यात 72 तीव्र कुपोषित तर 480 मध्यम कुपोषित बालके आढळली. या सर्व बालकांना ग्राम बालविकास केंद्रात दाखल करून त्यांना आहार आणि औषधोपचार करण्यात येणार आहे. कुपोषित बालकांचे आरोग्य सुधारण्यासाठी प्रशासनाकडून वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येतात. शून्य ते सहा वयोगटातील मुलांमधील हे कुपोषण टाळण्यासाठी मुलांना चौरस आहार देण्यात येतो. या मुलांच्या पोषणासाठी अंगणवाडी सेविकांना आगाऊ स्वरूपात जिल्हा परिषदेकडून निधी देण्यात येतो..

बालग्राम विकास केंद्रामध्ये या बालकांना आठ वेळा पौष्टिक आहार व आवश्यक औषधे देण्यात येतात. कुपोषित बालकांना दैनंदिन आहार, औषधे आणि त्यांचे दररोज मॉनिटरिंग केले जाते. याशिवाय शनिवारी व रविवारी या सुटीच्या दिवशीही तालुक्यातील अधिकार्यांना दुसर्या तालुक्यात जाऊन प्रत्यक्षात पाहणीची जबाबदारी देण्यात येते. तालुका आरोग्य अधिकार्यांच्या मार्गदर्शनाखाली औषधोपचार आणि चौरस आहार दिला जातो. महिला आणि बाल विकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जामसिंग गिरासे म्हणाले, जिल्ह्यात पुर्वी हजारांच्या घरात कुपोषित बालके आढळून येत होती. मात्र, त्याचे प्रमाणात आता कमी झाले आहे. यावेळी 552 कुपोषित बालके आढळून आली आहेत. ग्राम बालविकास केंद्रांमध्ये प्रत्येक अंगणवाडी सेविका, तालुक्यातील अधिकारी तसेच डॉक्टर यांनी चांगले काम केले. म्हणून कुपोषणाच्या संख्येत यंदा घट झाली आहे.

असा मिळणार चौरस आहार 

■ ग्राम बालविकास केंद्रामध्ये देण्यात येणाऱ्या आहारामध्ये नाचणी खीर, गहूसत्व खीर, कोथिंबीर मुठीया, मेथी मुठीया, मसाला इडली, थालीपीठ, केळी, मुरमुरा लाडू इ. पदार्थांचा समावेश असणार आहे.