127 मतदारसंघांचा सर्व्हे पूर्ण, उमेदवारही तयार; जरांगे यांचा सरकारला इशारा

मराठा आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारने 13 जुलैपर्यंतचा वेळ मागून घेतला आहे. दिलेल्या मुदतीत आरक्षणाचा प्रश्न सुटला नाही, तर मराठा समाज विधानसभा लढवणार असून आमचा 127 मतदारसंघांचा सर्व्हे पूर्ण झाला असून उमेदवारही तयार आहेत, असा इशारा मनोज जरांगे-पाटील यांनी दिला. राज्यात सुरू असलेले ओबीसींचे आंदोलन सरकारपुरस्कृत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

शहरातील गॅलक्सी या खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेले मनोज जरांगे-पाटील यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. सरकारने मागून घेतलेला वेळ पाळावा, असे स्पष्ट करून ते म्हणाले, आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. केवळ मराठा समाजासाठी नाही, तर गरिबीत जीवन जगणारा मुस्लीम समाज, बारा बलुतेदार यांच्यासाठी लढा दिला जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. निर्धारित कालावधीत सरकारने प्रश्न सोडवला नाही, तर शेवटी विधानसभा निवडणुकीत उतरावे लागेल, असा गर्भित इशाराही त्यांनी दिला.