बारामतीतील शासकीय महाविद्यालयाच्या कार्यक्रमाला शरद पवार व सुप्रिया सुळे यांना आमंत्रण नाही

बारामती येथे मंगळवारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील मध्यवर्ती सभागृहाच्या उद्घाटन सोहळ्याला स्थानिक खासदार सुप्रिया सुळे, माजी खासदार शरद पवार यांना आमंत्रण दिले नसल्याचे समोर आले आहे. सुप्रिया सुळे यांनी स्वत: ट्विट करत याबाबत माहिती दिली.

महाविद्यालयाचा सभागृह उद्घाटन सोहळा हा राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार यांच्या हस्ते होणार होता. या कार्यक्रमाच्या बॅनरवर शरद पवार, सुप्रिया सुळे, अजित पवार यांचे देखील नाव नव्हते. तसेच या कार्यक्रमासाठी शासकीय प्रोटोकॉलनुसार सुप्रिया सुळे यांना बोलवायला हवे होते. मात्र त्यांना त्याचे निमंत्रण देण्यात आलेले नव्हते. त्यावरून त्यांनी एक ट्विट करत राज्य सरकारला फटकारले आहे.

”बारामती येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आज शासनाच्या वतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आला, ही आनंदाची बाब आहे. पण या कार्यक्रमाचा बॅनर पहिला असता आश्चर्य वाटले. या बॅनरवर शरद पवार, उपमुख्यमंत्री व बारामतीचे आमदार अजित पवार आणि माझे नाव नाही. यासोबत शरद पवार व मला या कार्यक्रमाचे निमंत्रण देखील नाही. निमंत्रण असते तर आम्ही दोघेही आनंदाने कार्यक्रमाला आलो असतो. कार्यक्रमाच्या ठिकाणी प्रोटोकॉल पाळला गेला नसल्याचे दिसते. यामध्ये जी नावे नमूद आहेत ती नेमक्या कोणत्या प्रोटोकॉलमध्ये बसतात, हे समजत नाही. हा देश संविधानावर चालतो, त्यामुळे महाराष्ट्र सरकारने प्रोटोकॉलचा नियमांमध्ये काही बदल केले असतील तर आम्हाला कृपया अवगत करावेत”, असे ट्विट सुप्रिया सुळे यांनी केले आहे.