कॉपी करून पास होण्यात काय मजा आहे? सुप्रिया सुळे यांचा दादांना टोला

‘‘कॉपी करून पास होण्यात काय मजा? अभ्यास करून पास होऊन प्रमाणपत्र घेऊन दाखवा,’’ अशी अप्रत्यक्ष टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरद पवार) खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्यावर केली. युगेंद्र पवार यांची बारामती मतदारसंघात कान्हेरी येथे जाहीर सभा झाली. त्या सभेत बोलताना सुप्रिया सुळे यांनी नाव न घेता अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केला.

बारामतीत पवार विरुद्ध पवार अशी लढत होत असल्यामुळे राज्याचे लक्ष बारामतीकडे लागले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचे पुतणे युगेंद्र पवार आमनेसामने आहेत. विरोधकांचा समाचार घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘‘अरे कॉपी करून पास होण्यात काय मजा? अभ्यास करून पास होऊन सर्टिफिकेट घेण्याचा आनंद वेगळा असतो. मला आधी वाटायचे की सर्वजण गेले, आता आपले काय होणार? मला लोकसभेच्या निवडणुकीत समजले की, ताकद फक्त जनतेत असते आणि ते जनतेने लोकसभेला दाखवून दिलेले आहे. कोणी काहीही म्हटले तरी बारामती मतदारसंघ ना मला कळतो, ना त्यांना (अजित पवारांना) कळतो. हा मतदारसंघ फक्त शरद पवारांना कळतो,’’ असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी नाव न घेता अजित पवारांवर टीका केली. ‘‘महाराष्ट्रात मी अनेक ठिकाणी लागलेले बॅनर पाहते. त्या बॅनरवर लिहिलेले आहे की, हे चिन्ह तुमचे नाही. या चिन्हाची लढाई न्यायालयात सुरू आहे. पक्ष आणि चिन्ह हिसकावण्याचे काम अदृश्य शक्तीने केलेले आहे. अदृश्य शक्तीने आपले घर पह्डले. पक्ष आणि चिन्ह हिसकावण्याचे काम केले. लोकसभेच्या निवडणुकीत मी कोणत्या चिन्हावर निवडणूक लढणार हेदेखील मला माहिती नव्हते. मी आजही सांगते की, हा देश संविधानाने चालणार आहे. कोणत्याही अदृश्य शक्तीने चालणार नाही, असा हल्लाबोल सुळे यांनी केला.

आपला देश संविधानाने चालतो

‘निवडणूक आयोगात ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हाबाबत सुनावणी सुरू होती तेव्हा निवडणूक आयोगात शरद पवार चार-चार तास बसायचे. काही बोलत नव्हते, पण शांत बसायचे. त्या ठिकाणी आम्हीदेखील असायचो. तेव्हा अनेकजण आमची मस्करी करायचे. म्हणायचे, तुमचं चिन्ह आणि पक्ष जाणार आहे. मात्र, आम्ही काहीही बोलायचो नाही. शांत बसायचो. पण मी आजही सांगते की हा देश संविधानाने चालणार आहे. हा देश कोणत्याही अदृश्य शक्तीने चालणार नाही, यावर माझा विश्वास आहे’, अशा शब्दांत खासदार  सुप्रिया सुळे यांनी भाजपवर निशाणा साधला.