फोडाफोडीसाठी पैसे आहेत, अंगणवाडी सेविकांसाठी पैसे नाहीत; सुप्रिया सुळे यांचा सरकारवर निशाणा

supriya-sule

शिर्डी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शिबिर आयोजित करण्यात आले होते. तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रसारमाध्यामांशी संवाद साधला, तसेच त्यांनी अंगणवाडी सेविकांचीही भेट घेतली.

राज्यातल्या अंगणवाडी सेविकांचा विषय अत्यंत गंभीर आहे. राज्यातल्या ट्रिपल इंजिन खोके सरकारला मला विचारायचे आहे, कार्यक्रम करण्यासाठी, ED, CBI साठी आणि पक्ष फोडण्यासाठी तुमच्याकडे पैसे आहेत. पण आमच्या या भगिणींना पगार वाढ देण्यासाठी तुमच्याकडे पैसे नाहीत, हे दुर्देव आहे, अशी जळजळीत टिका यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

त्या पुढे म्हणाल्या की, “मी मेट्रोच्या विकासाच्या विरोधात नाही, पण जर मेट्रोसाठी हाजारो कोटी तुमच्याकडे आहेत तर या भगिणींना देण्यासाठी तुमच्याकडे पैसे का नाहीत. आमचे लोक उपाशी राहीले तर या मेट्रोमध्ये कोण बसणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. अश्रुंवर उभे असणारे हे सरकार फार काळ टिकणार नाही. त्यांना फक्त मोठं मोठे कार्यक्रम करायचे आहेत. अशी टिका करत त्यांनी खोके सरकारचा जाहीर निषेध केला.

आम्ही राजकराणात सेवेसाठी आलो आहोत. भाजप ही भ्रष्ट जुमला पार्टी आहे. त्यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर आरोप केले आणि त्यांच्यामागे ED, CBI लावली आणि आता तेच भाजपसोबत आहेत. भाजपचे नेते अमित शहा यांनाही सुप्रिया सुळे यांनी टोला लगावला. त्या म्हणाल्या की, भाजपचे नेते अमित शहा यांनी सांगितले होते की एक बोट आमच्याकडे दाखवता तेव्हा तीन बोट तुमच्याकडे असतात. विरोधक असला की घर फोडायची आणि तोच आपल्या बाजूला आला की सगळ विसरुन जायचं, अशी यांची वृत्ती असल्याचा आरोपही सुप्रिया सुळे  यांनी केला.

अयोध्याच्या निमंत्रणाविषयी त्यांना प्रश्न विचारला असता, त्या म्हणाल्या की, आपण राम कृष्ण हरी वाले माणसं आहोत. राम ही कुणाची मक्तेदारी नाही. पिण्याच्या पाण्याची समस्या आणि दुष्काळी परिस्थिती याबाबत मुख्यमंत्री व उपमु्ख्यमंत्री यांनी लक्ष घालावे. प्रकाश आंबेडकर यांनी लवकर आमच्यात सामील व्हावे त्यांच्या येण्याने ताकद वाढणार आहे, असेही त्या म्हणाल्या. गेल्या कित्येक दिवसांपासून अंगणवाडी सेविकांचा संप सुरु आहे, त्यापार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांशी बोलणे झाल्यावर सुप्रीया सुळे यांनी अंगणवाडी सेविकांची भेट घेतली.