पुणे अपघातातील आरोपीला वाचवण्यासाठी कोणत्या राजकीय नेत्यांनी फोन केला होता. वकील तिथे कोणी पाठवला, त्या आरोपीला इतक्या पटकन बेल कशी मिळाली, या सगळ्याची उत्तरे राज्याच्या गृहमंत्र्यांनी दिले पाहिजेत. इतके असंवेदनशील सरकार हे आजपर्यंत कधीच पाहिलेलं नाही, असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष, खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, पुणे अपघाताच्या घटनेत कुणाच्या राजकीय दबावामुळे संबंधित मुलाला जामीन मिळाला. राजकीय दबावाला बळी पडू नका असं म्हणणारे देवेंद्र फडणवीस नेमकं कुणाबद्दल बोलत होते? हे त्यांनी राज्याला सांगावं. त्याचबरोबर राजकीय दबाव हा सत्ताधारी पक्ष टाकू शकतो. तसेच दोन लोकांचे जीव घेतल्यानंतर संबंधित मुलाला केवळ निबंध लिहिणे, अशा प्रकारच्या किरकोळ शिक्षा दिल्या जातात. हे सरकार असंवेदनशील असल्याचे यावरून दिसत आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
पुढे सुप्रिया सुळे म्हणाल्या की, पुण्याच्या पालकमंत्र्यांसोबत माझी देखील गेल्या कित्येक दिवसांपासून भेट नाही. कारण जिल्ह्यामध्ये पुणे अपघातासह दुष्काळ, इंदापूरमधील घटना, अतिवृष्टी असे अनेक प्रश्न आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस काल पुण्यात आले असता हा पुण्याच्या पालकमंत्र्यांबाबतचा प्रश्न त्यांना विचारायला हवा होता, असेही सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, लोकसभा निवडणुकीत बारामती, शिरूर आणि अहमदनगर या मतदारसंघामध्ये अनेक ठिकाणी गैरप्रकार झाले आहेत. यासंदर्भात मी स्वतः बारामती मधील 143 तक्रारी निवडणूक आयोगाकडे केल्या आहेत. मतदानाच्या एक दिवस आधी रात्री अनेक परिसरातील कॅमेरे बंद करण्यात आले होते. पैशाचे वाटप, दमदाटी असे प्रकार घडले. त्याचे सगळे व्हिडिओ तुमच्या चॅनलवर प्रसिद्ध झाले. त्याच्यानंतर निलेश लंकेच्या मतदारसंघात परत तसाच प्रकार घडला. हे एका सशक्त लोकशाहीसाठी अतिशय घातक आहे, असेही सुप्रिया सुळे यांनी स्पष्टपणे सांगितले.
यावर सविस्तर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला चांगल्या प्रकारे यश मिळणार आहे. राज्यातील वातावरण महाविकास आघाडीच्या बाजूने होते. त्यामुळे निकालाच्या दिवशी सर्वाधिक जागा महाविकास आघाडीला मिळतील, असा विश्वासही सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला आहे. राज्यात दुष्काळी परिस्थिती उद्भवेल, असे मी चार ते पाच महिन्यापूर्वीच राज्य सरकारला सांगितले होते. पण, सरकारने त्यावर काहीही उपाययोजना केल्या नाहीत. आज राज्यात भयावह दुष्काळी स्थिती आहे. खासगी लोकांनी चारा छावण्या सुरु केल्या आहेत. सरकार करतंय काय, असा प्रश्न देखील सुप्रियाताई सुळे यांनी उपस्थित केला.