टॅलेंट वाया जाऊ देऊ शकत नाही…; दलित विद्यार्थ्याला प्रवेश देण्याचे सुप्रीम कोर्टाचे IIT ला निर्देश

वेळेत फी न भरल्याने दलित विद्यार्थ्याला प्रवेश नाकारणाऱ्या IIT धनबादला सर्वोच्च न्यायालयाने फटकारले आहे. अशा प्रतिभावंत तरुणाचे टॅलेंट वाया जाऊ देऊ शकत नाही, असे म्हणत सर्वोच्च न्यायालयाने आपल्या विशेषाधिकाराचा वापर करत सदर विद्यार्थ्याला प्रवेश देण्याचे निर्देश IIT धनबादला दिले आहेत.

उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर जिल्ह्यातील अतुल कुमार नामक 18 वर्षीय तरुणाला IIT धनबादमध्ये बी.टेक कोर्समध्ये प्रवेश घ्यायचा होता. IIT धनबादमध्ये त्याला जागाही मिळाली. या कोर्ससाठी आवश्यक 17 हजार 500 रुपये फी भरण्यासाठी त्याला चार दिवसांची मुदत देण्यात आली होती. मात्र गरीब परिस्थितीमुळे फी चे पैसे जमा करुन भरण्यास त्याला काही मिनिटे उशिर झाला. यामुळे तो बी.टेकला प्रवेश मिळवू शकला नाही.

अतुलच्या वडिलांनी मात्र हार न मानता न्यायालयात धाव घेतली. तीन महिने वडिलांनी मुलाच्या प्रवेशासाठी एससी/एसटी आयोग, झारखंड आणि मद्रास उच्च न्यायालयात फेऱ्या मारल्या. मात्र, तेथे त्यांच्या पदरी निराशाच पडली. अखेर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.

सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड या प्रकरणाची सुनावणी करताना IIT धनबादला खडे बोल सुनावले. अशा प्रतिभावंत तरुणाचे टॅलेंट वाया जाऊ देऊ शकत नाही. याचिकाकर्त्यासारखे वंचित गटातून येणारे हुशार विद्यार्थी ज्यांनी आयआयटीत प्रवेश मिळवण्यासाठी सर्वकाही केले, त्यांना वंचित ठेवता कामा नये. उमेदवाराला IIT धनबादमध्ये प्रवेश द्यावा, असे निर्देश चंद्रचूड यांनी दिले. तसेच विद्यार्थ्याने फी भरली असती तर त्याला ज्या बॅचमध्ये प्रवेश मिळाला असता त्याच बॅचमध्ये त्याला प्रवेश द्यावा, असेही सर्वोच्च न्यायालयाने पुढे नमूद केले.