दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींप्रकरणी दाखल झालेल्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाने खरडपट्टी काढली आहे. सेलिब्रिटी आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरही जर अशा प्रकारच्या दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींचं समर्थन करत असतील, तर त्यासाठी तेही समप्रमाणात जबाबदार आहेत, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे.
खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींसाठी जाहिरात एजन्सी आणि त्यांचा प्रसार करणारेही समप्रमाणात जबाबदार आहेत. तसंच, सर्वोच्च न्यायालयाने इंडियन मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षांनी दिलेल्या एका वादग्रस्त विधानावर नोटीस जारी करून 14 मे पर्यंत उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
तसंच, सर्व ब्रॉडकास्टर्सना कोणतीही जाहिरात प्रसारित करण्यापूर्वी संबंधित जाहिरात ही केबल जाहिरात अधिनियमांचं पालन करत आहे, असं स्वघोषणा पत्र जारी करावं, असे निर्देशही सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.