मनोज जरांगे यांना वाढता पाठिंबा; जालन्याहून 500 ट्रॅक्टरसह हजारो आंदोलक रवाना

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या या आंदोलनास जालना आणि बदनापूरमधीस सकल मराठा समाजानेही पाठिंबा दिला आहे. त्यासाठी बदनापूर ते अंतरवाली सराटी ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात 500 हून अधिक ट्रॅक्टरसह हजारो आंदोलक सहभागी झाले होते. शिस्तबद्ध मार्गाने हा मोर्चा अंतरवाली सराटीकडे रवाना झाला.

मराठा आरक्षण त्वरीत लागू करावे या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. त्यांच्या या आंदोलनाला मोठा पाठिंबा मिळत असून गावागावात ठिय्या आंदोलन, उपोषणे आदी आंदोलने सुरू आहेत. बदनापूर येथील सकल मराठा समाजाच्या वतीनेही धोपटेश्वर येथे मागील पाच दिवसांपासून ठिय्या आंदोलन सुरू आहे. तालुक्यातील मराठा समाज बांधवांनी आंदोलन आणखी तीव्र करत व मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्याच्या उददेशाने बदनापूर ते अंतरवाली सराटी येथे ट्रॅक्टर मोर्चा काढण्याचे नियोजन केले होते. सकल मराठा समाज बदनापूर यांच्यावतीने या बाबत गावागावात आवाहन करण्यात आले होते.

या आवाहनाला प्रतिसाद देत बदनापूर तालुक्यातील विविध गावांतून पाचशेपेक्षा जास्त ट्रॅक्टर सकाळी 11 वाजता बदनापूर येथील धोपटेश्वर फाटा (शिवराज कॉम्पलेक्स) येथे जमा झाले. या ट्रॅक्टर व ट्रॉलीमध्ये हजारो आंदोलक अंतरवाली सराटीकडे रवाना झाले. बदनापूर ते अंतरवाली सराटीपर्यंत ठिकठिकाणी या मोर्चाचे स्वागत करण्यात आले होते. या मोर्चासाठी स्वयंस्फुर्तीने समाज बांधव येत होते. शासनाकडे शांततेच्या मार्गाने आरक्षणाची मागणी करण्यात येत असून जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत माघार नाहीच, असा पवित्रा घेण्यात आला आहे. या वेळी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे तालुकाप्रमुख जयप्रकाश चव्हाण, सकल मराठा बदनापूर तालुका समन्वयक राजू जर्‍हाड, पंचायत समिती उपसभापती रवीकुमार बोचरे, धोपटेश्वरचे माजी सरपंच नंदकिशोर दाभाडे, राधाकिसन शिंदे, राम सिरसाट, संतोष वरकड, उदय काकडे आदी उपस्थित होते.

तीर्थपुरी ते अंतरवाली सराटी ट्रॅक्टर रॅली
मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थनासाठी मंगळवारी तीर्थपुरी येथून ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली. तीर्थपुरी ते अंतरवाली सराटी असा 30 ते 35 किमी ट्रॅक्टर रॅली काढून जरांगे पाटील यांच्या उपोषणाला समर्थन देण्यात येत आहे. मराठा समाजाला आरक्षण द्यावे, शांततेने सुरू असलेले आंदोलनात महिला, अबालवृद्ध यांच्यावर लाठीमार करणाऱ्या अधिकार्‍यांवर बडतर्फीची कारवाई करावी. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसीत समावेश करण्यात यावा अशी मागणी ट्रॅक्टर रॅलीद्वारे करण्यात आली.