ठरलं! सुनीता विल्यम्स 6 जुलैला पृथ्वीवर परतणार; अंतराळात अडकलेल्यांना परत आणण्यासाठी नासाचे शर्थीचे प्रयत्न

हिंदुस्थानी वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बच विल्मोर अंतराळात अडकले आहेत. त्यांना अंतराळात घेऊन गेलेल्या स्टारलायनर बोइंगमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने त्यांच्या परतीच्या प्रवासात मोठी अडचण आलीय. त्यांना सुरक्षितपणे पृथ्वीवर आणण्यासाठी नासाचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आता 6 जुलै रोजी त्यांना पृथ्वीवर आणले जाईल, असे नासाच्या सूत्रांकडून समजतेय.

6 जूनपासून सुनीता विल्यम्स आणि बच विल्मोर आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन येथे आहेत. ते 13 जून रोजी पृथ्वीवर परतणार होते. मात्र काही तांत्रिकी कारणांमुळे त्यांच्या परतीची तारीख पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर 26 जून रोजी दोघे पृथ्वीवर परत येतील, असे सांगण्यात आले. मात्र या दिवशीही ते शक्य होऊ शकले नाही. हेलियम गळतीमुळे बोइंगच्या परतीच्या प्रवासात अडचण निर्माण झाली आहे.

एलन मस्क यांची मदत घेणार
एलन मस्क यांची स्पेस एक्स ही संस्था आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशनमधून अंतराळवीरांना आणण्यास सक्षम आहे. त्यामुळे मस्क यांची मदत घेतली जाण्याची चर्चा रंगली आहे. मात्र सध्यातरी मस्क यांच्या स्पेस एक्सपेक्षा बोइंग स्टारलायनरमधील बिघाड दुरुस्त करण्यामध्ये नासा आणि यानाच्या टीमचे लक्ष आहे. नासाचे कर्मशिअल क्रू प्रोग्रॅम मॅनेजर स्टिव स्टिच यांच्या म्हणण्यानुसार, स्टारलायनर 45 दिवसांपर्यंत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशनमध्ये उतरवले जाऊ शकते. आम्ही एसओपीनुसार काम करतोय. काही डेटाच्या आधारे निर्णय घेतोय आणि मार्ग शोधतोय, असे नासाकडून स्पष्ट करण्यात आल़े