>> दीपक पवार
विक्रोळी विधानसभा मतदारसंघात गेल्या दहा वर्षांत शिवसेनेने प्रचंड विकासकामे केली आहेत. यावेळीही या विकासकामांचीच मशाल मतदारसंघात धगधगणार हे निश्चित आहे. विद्यमान आमदार सुनील राऊत यांनी केलेली विकासकामे प्रचंड आहेत. त्यांचा जनसंपर्कही मोठा आहे. तसेच शिवसेनेसमोर कोणत्याही प्रकारचे तगडे आव्हानही नाही. त्यामुळे यावेळीही विक्रोळी विधानसभा मतदारसंघात 2019 प्रमाणे एकतर्फीच लढत होणार हे निश्चित आहे.
गेल्या 10 वर्षात विकासकामांच्या जोरावर सुनील राऊत यांनी आपला दबदबा निर्माण केला. पुनर्विकास, रुग्णालय, सांडपाणी, रस्ते आणि वाहतुकीचा प्रश्न अशा अनेक समस्या मार्गी लावत सुनील राऊत यांनी या मतदारसंघातील जनतेच्या मनात मानाचे स्थान मिळवले आहे. विक्रोळी पूर्व, पश्चिम जोडणारा रेल्वे पादचारी पूलही तयार करण्यात येणार आहे. नवीन जलवाहिन्या टाकण्यात येत असून विक्रोळीकरांना 24 तास पाणी उपलब्ध होणार आहे. अशा अनेक विकासकामांमुळे या मतदारसंघात शिवसेनेचाच दबदबा कायम आहे.
दोन वेळा गद्दारी आणि उमेदवारी
सुवर्णा करंजे या शिवसेनेतून नगरसेविका झाल्या. नारायण राणे यांनी शिवसेनेशी गद्दारी करून काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर करंजे यादेखील त्यांच्यामागोमाग काँग्रेसमध्ये गेल्या. त्यानंतर पुन्हा शिवसेनेत प्रवेश करून नगरसेविका झाल्या. आता गद्दार मिंधे गटाच्या वळचणीला जाऊन विधानसभेसाठी उमेदवारी मिळवली. त्यामुळे यावेळी कर्तृत्वशून्य असलेल्या करंजे यांचे डिपॉझिटही वाचणार नाही अशी स्थिती आहे.
शिवसेनेची विकासकामे
विक्रोळीतील कन्नमवार नगर येथे क्रांतिवीर महात्मा ज्योतिबा फुले या 11 मजली 500 खाटांच्या सुपरस्पेशालिटी रुग्णालयासाठी शिवसेनेने सातत्याने पाठपुरावा केला. 2019-20 मध्ये आराखडा तयार करण्यात आला. अर्थसंकल्पात 150 कोटींची तरतूदही करण्यात आली.
कन्नमवारनगरमधील 850 घरे तसेच अडीच हजार झोपडय़ा सीआरझेड क्षेत्रात येतात. त्यातील सीआरझेडबाधितांचाही प्रश्न लवकरच मार्गी लागेल.
नवीन जलवाहिन्या टाकण्यात येत असून त्यामुळे प्रत्येक इमारतीला सक्शन टाकीच्या माध्यमातून पाणीपुरवठा करून 24 तास पाणी मिळणार आहे.
तरणतलाव, नाटय़गृहाचा प्रश्नही लवकरच मार्गी लागणार आहे. संपूर्ण मतदारसंघातील रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे.
विक्रोळीकरांना छत्रपती संभाजी मैदान मिळाले. 10 हजार चौरस फुटांच्या या मैदानात जॉगिंग पार्क. म्युझिक ट्रक, नाना नानी पार्क, ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रभात कट्टा, ज्येष्ठ महिलांसाठी सुप्रभात महिला कट्टा, लहान मुलांसाठी खेळणी अशा अनेक सुविधा देण्यात आल्या आहेत.