अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा लोकसभा निवडणूकीत बारामती मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांनी दणदणीत पराभव केला. पराभवामुळे लोकसभेत जाऊ न शकलेल्या सुनेत्रा पवार आता राज्यसभेवर निवडून जाण्याच्या तयारीत आहेत. सुनेत्रा पवार यांनी गुरुवारी महाराष्ट्र विधान भवनात जाऊन उमेदवारी अर्ज दाखल केला.
राज्यसभेसाठी अर्ज भरल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी प्रसारमाध्यमांनी अजित पवार व सुनेत्रा पवार यांचा मुलगा पार्थ पवार हे देखील राज्यसभेवर जाण्यासाठी इच्छूक होते का? व तुम्ही अर्ज भरल्यामुळे ते नाराज आहेत का? असे प्रश्न केले.
यावर बोलताना सुनेत्रा पवार म्हणाल्या, ”मला पक्षाने उमेदवारी दिली आहे. माझ्या उमेदवारीचा निर्णय पक्षातील सर्व वरिष्ठ नेत्यांनी मिळून घेतला आहे. त्यामुळे मी ठामपणे सांगेन की पक्षात कोणत्याही प्रकारची नाराजी नाही. मला उमेदवारी ही कार्यकर्त्यांच्या मागणीमुळे मिळाली आहे. त्यामुळे पार्थ पवार यांनी देखील मला सांगितले की तुम्हीच राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरला पाहिजे. स्वत: पार्थचा तसा आग्रह होता, असे सुनेत्रा पवार म्हणाल्या.
छगन भुजबळ देखील नाराज
अजित पवार गटातील ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे लोकसभा निवडणूकीसाठी उमेदवारी मिळावी म्हणून आग्रही होते. मात्र त्यांना लोकसभेचं तिकीट नाकारण्यात आलं. त्यानंतर राज्यसभेचं तरी तिकीट आपल्याला मिळेल अशी छगन भुजबळ यांची अपेक्षा होती. मात्र राज्यसभेचं तिकीट सुनेत्रा पवारांना मिळाल्याने पुन्हा एकदा छगन भुजबळ नाराज असल्याचे समजते.