श्रीरामपूर जिल्हानिर्मितीसाठी रविवारी बंदची हाक

श्रीरामपूर जिल्हा करावा, या मागणीसाठी रविवारी (दि. 14) श्रीरामपूर बंदची हाक स्वाभिमानी श्रीरामपूर जिल्हा कृती समितीच्या वतीने देण्यात आली आहे.

स्वाभिमानी श्रीरामपूर जिल्हा कृती समितीच्या वतीने श्रीरामपूर जिल्हा करावा, या मागणीसाठी कृती समितीचे अध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांच्या नेतृत्वाखाली प्रांताधिकारी कार्यालयावर भव्य निदर्शने करण्यात आली.

माजी नगराध्यक्ष अनुराधा आदीक म्हणाल्या, श्रीरामपूर जिल्हा होण्यासाठी स्व. गोविंद आदिक यांनी मूलभूत सुविधा उपलब्ध करून ठेवल्या आहेत. श्रीरामपूर जिल्हा व्हावा, हे प्रत्येक श्रीरामपूरकरांचे स्वप्न आहे. ते स्वप्न साकार करण्यासाठी स्वाभिमानी श्रीरामपूर जिल्हा कृती समितीकडून श्रीरामपूर जिह्यासाठी जी-जी आंदोलने होतील, त्यामध्ये मी ताकदीने उपस्थित राहीन, असेही त्या म्हणाल्या.

कृती समितीचे अध्यक्ष सुभाष त्रिभुवन म्हणाले, श्रीरामपूर जिल्हा करावा, ही गेल्या 40 वर्षांपासून श्रीरामपूरकरांची मागणी आहे. राजकीय आकसापोटी श्रीरामपूर जिल्हा होण्यास अडथळा निर्माण केला जात आहे. म्हणून सरकारचे लक्ष वेधण्यासाठी व श्रीरामपूरवर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी रविवारी (दि. 14) श्रीरामपूर स्वयंस्फूर्तीने कडकडीत बंद पाळणार आहे. प्रत्येक श्रीरामपूरकरांनी बंदमध्ये सहभागी व्हावे, असे आव्हान त्रिभुवन यांनी केले.

उपनगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे म्हणाले, श्रीरामपूर जिल्हा करण्यासाठी सर्व गटतट विसरून श्रीरामपूरकर म्हणून आपल्याला एकजूट दाखवावी लागेल. कामगारनेते नागेश सावंत, कृती समितीचे कार्याध्यक्ष बाबा शिंदे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण पाटील-नाईक, शिवसेनेचे सचिन बडदे, प्रशांत लोखंडे, श्रीरामपूर मर्चंट असोसिएशनचे संजय कासलीवाल, आम आदमी पार्टीचे तिलक डुंगरवाल, मुकेश कोठारी, राहुल मुथा, प्रवीण गुलाटी, अशोक उपाध्ये, उमेश पवार, गौतम उपाध्ये, संतोष बत्रा, योगेश ओझा, अभिजीत लिप्टे, बाळासाहेब चांडोळे, शरद शेरकर, नीलेश बोरावके, रियाज पठाण, सतीश कुदळे, डॉ. संजय नवथर, अमोल साबणे, नितीन कापसे, अनिल तलोज, ऍड. संदीप चोरगे, आदित्य आदिक, अविनाश पोहेकर, अनिरुद्ध भिंगारवाला, शुभम लोळगे, आबासाहेब अवताडे, प्रवीण फरगडे, मच्छिंद्र साळुंखे, वामन लचके, अनिल चांडवले, हरेश भटेजा, संदीप धिवर, नितीन जाधव, अल्ताफ शेख, रमेश अमोलिक यांच्यासह सर्वपक्षीय नेते तसेच व्यापारी उपस्थित होते.