मनाचिये गुंती – चुकीचा विश्वास

>> सुजाता पेंडसे

स्वतच्या वागण्यावर, बोलण्यावर, कृतीवर चुकीच्या मर्यादा घातत्या जात असतील तर त्याचे परिणामही तसेच दिसतात हे पक्कं लक्षात घ्या. आपण काय काय करू शकतो याची आपल्यालाही खरी कल्पना नसते. कारण आपल्याच चुकीच्या विश्वासाचं कुंपण आपण लावून घेतलेलं असतं. ते काढायचाच अवकाश, कोणत्याही यशस्वी व्यक्तींपेक्षा एकही कमी गुण आपल्यामध्ये नसतो. फक्त हवा तो स्वतवरचा विश्वास! ईश्वराने प्रत्येकाला बनवताना एकसारखे तंत्र वापरले आहे. म्हणजे नाक, डोळे, कान, हात, पाय किंवा शरीरांतर्गत अवयव सगळे ज्या त्या ठिकाणी असतात. फरक आहे तो फक्त विचारांचा. आपण काय पद्धतीने विचार करतो, कशावर विश्वास ठेवतो याचा. बाकी सगळं जर सारखं मिळालेलं असेल तर योग्य त्या पद्धतीनं विचार करणं हे आपलंच काम नाही का?

एखाद्या गोष्टीवर विश्वास असणं म्हणजे नेमकं काय? तुम्हाला काय वाटतं? प्रत्येकाचं थोडंफार वेगवेगळं मत असलं तरी सर्वसाधारणपणे समोर जे येईल त्यावर होकारात्मक विचार करणं, त्यापुढे शंकाकुशंका न काढणं म्हणजे विश्वास. म्हणजे ‘विश्वास’ या शब्दातच खरं तर एक सकारात्मकता आहे, पण म्हणून तुम्ही ज्या ज्या गोष्टीवर विश्वास ठेवता, ते सगळं चांगलंच असतं का? या प्रश्नाचे अर्धे उत्तर खरे आहे. म्हणजे विश्वास ठेवणं ही सकारात्मक बाब असली तरी तो चुकीच्या किंवा नको त्या गोष्टीवर ठेवणं हे चुकीचं आहे.

विश्वास कशाच्या पायावर उभा असतो, तर ‘अनुभव’ हे त्याचं उत्तर आहे. आपल्याला जसा अनुभव आलेला असतो किंवा सातत्यानं जे दिसत असतं, त्यावरून आपण ज्या निष्कर्षावर पोचतो, त्यावर विश्वास अवलंबून असतो. समजा, तुम्ही शिकत आहात. तुम्हाला एखादे तुमचे सर खूप आवडतात. त्यांचे विचार, त्यांची शिकवण याचा जबरदस्त अनुभव तुम्हाला आलेला आहे. तर तुम्हाला त्यांनी कोणतीही गोष्ट सांगितली तर लगेच पटते. कारण तुमचा अनुभव असा असतो, मत असं असतं की, सर कधीही चुकीचं सांगणार नाहीत. जे सांगतील ते माझ्या भल्याचंच असेल. हे मागच्या अनुभवांना जमेस धरून तुम्ही ठरवलेलं असतं. म्हणजे तो विश्वास सरांनी त्यांच्या मागच्या कृतींमुळे तुमच्या मनात निर्माण केलेला असतो.

याहून अगदी वेगळं उदाहरण सांगायचं तर तुमच्या माहितीत अशी एखादी व्यक्ती आहे की, जी दर काही महिन्यांनी एखादा नवा बिझनेस सुरू करते, परंतु त्याचे व्यवहार असे असतात की, तो बिझनेस यशस्वी होतच नाही. मग पुन्हा तो नव्या व्यवसायाकडे वळतो. इथे त्या व्यक्तीच्या प्रयत्नांचे कौतुक कुणी करत नाही. कारण त्याचे व्यवहार चुकीचे असतात. अशी व्यक्ती तुमच्याकडे आली आणि त्याच्या एका नव्या बिझनेसमध्ये पार्टनर व्हा म्हणून सांगू लागली, तर तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवाल? अर्थातच नाही. कारण प्रत्यक्ष तुम्हाला त्याचा उपद्रव झालेला नसला तरी पुढे नुकसान सोसावे लागू शकते हे तुम्हाला समजते. त्यामुळे तुम्ही त्याच्या कोणत्याही प्लॅनवर विश्वास ठेवणार नाही. कारण अनुभव तसाच आहे. म्हणजेच अनुभव हा विश्वासाचा पाया असतो.  विश्वासाचंच एक दुसरं रूप आहे ती म्हणजे श्रद्धा. आध्यात्मिक जगातला विश्वास म्हणजे श्रद्धा. इथे मात्र आधी अनुभव, मग विश्वास अशी थिअरी असत नाही, तर हव्या त्या व्यक्तीवर, दैवतावर डोळे मिटून विश्वास ठेवलेला असतो तो गाढ विश्वास इतका दृढ असतो की, त्यातून काही अविस्मरणीय अनुभव मिळतात. ज्याला सर्वसामान्य लोक अद्भुत चमत्कार म्हणतात. अशी श्रद्धा मनाला संपूर्णपणे व्यापून राहते. ‘त्याच्या’साठी सर्वकाही त्यागायची, करायची तयारी असते! अनेक संत, महात्मे यांचा असा अढळ विश्वास आपण पाहात आलेलो आहोत.

अगदी पंढरपूरला पायी जाणाऱया वारकरी लोकांचंच पहा. प्रचंड अंतर न थकता, गाणी म्हणत, नाचत केवळ विठूरायाचं दर्शन घेण्यासाठी ज्या ओढीनं जातात, ती विस्मयचकित करणारी श्रद्धा म्हणजेच विश्वास आहे. विठूरायाचं दर्शन झालं की, सगळं भरून पावतं म्हणत संसारातल्या अडीअडचणींना सामोरे जायला सज्ज होतात. तो प्रत्येक वारकरी हा श्रद्धेचा, विश्वासाचा उत्तम अनुभव देतो…घेतो.

आपला जसा बाहेरच्या गोष्टींवर, व्यक्तींवर विश्वास असतो तसाच स्वतवरही विश्वास असतो. ज्याचा स्वतवर ठाम विश्वास असतो तो माणूस कधीही, कोणत्याही प्रसंगी डगमगत नाही. स्वतवरचा हा विश्वास कशातून निर्माण होतो, तर एकतर आपल्याला वेळोवेळी आलेले अनुभव किंवा बाहेरच्या जगाने वेगवेगळ्या प्रसंगी तुमच्याबद्दल बनवलेली  किंवा तुम्हाला ऐकवलेली त्यांची मतं. उदा. कुणीतरी तुम्हाला म्हणालेलं असतं “तू कोणत्याही अडचणीच्या प्रसंगी घाबरत नाहीस. शांत डोक्यानं मार्ग काढतोस!’’ हे वाक्य ऐकलं की, अंगावर मूठभर मांस चढल्यासारखं वाटतं किंवा “किती शिस्त आहे तुमच्या अंगात! कोणतंही काम तुम्ही बिनचूक करता’’ हे ऐकल्यावर कुणाचाही आत्मविश्वास वाढेलच की नाही? याउलट जर एखादी जवळची व्यक्ती तुम्हाला वारंवार म्हणत असेल की, “तुला एकही गोष्ट धडपणे कशी जमत नाही? प्रत्येक वेळी तू काही ना काही गोंधळ करणारच !’’ असे ऐकल्यावर तुमच्या आत्मविश्वासाचे खच्चीकरण होईल की नाही?

स्वतबद्दलची अशी अनेक मतमतांतरे तुम्ही ऐकत असता. विशेषत अगदी बालवयातच जिथे तुमच्या मनावर कोणतेही ठसे चटकन उमटतात अशा काळात झालेले परिणाम पुसायला खूप वेळ लागतो. बऱयाच व्यक्तींच्या विचित्र वर्तनाची संगती त्यांच्या बालवयात घडलेल्या घटनांपाशी पोचल्यावर लागते. अर्थात बालपण जे ‘भूतकाळ’ आहे, त्याचे परिणाम पुसूनही टाकता येतात. योग्य विचारांची जोपासना केली तर यातील बऱयाच निगेटिव्ह गोष्टी कमी करता येतात.

प्रत्येकालाच स्वतच्या बऱयावाईट गुणांची माहिती असते. कुठे चुकतंय तेही समजत असतं, परंतु स्वतवर विश्वास नसतो किंवा चुकीचा विश्वास डेव्हलप झालेला असतो. उदा. “मला अमुक अमुक काम अजिबात जमत नाही!’’ किंवा “मी किती प्रयत्न करतो, परंतु माझे एकही काम पूर्ण होत नाही!’’, “माझेच नशीब असे का आहे? मलाच अशी फसवणारी माणसे का भेटतात?’’ अशा प्रकारचे विचार जर सतत आपल्या मनात येत असतील तर तुमचा विश्वास ‘चुकीच्या’ गोष्टींवर आहे हे लक्षात घ्या. ज्यावर तुम्ही विश्वास ठेवता, त्यानुसार कृती घडते आणि पुन्हा चुकीचे अनुभव येतात.

स्वतच्या वागण्यावर, बोलण्यावर, कृतीवर चुकीच्या मर्यादा घातत्या जात असतील तर त्याचे परिणामही तसेच दिसतात हे पक्कं लक्षात घ्या. आपण काय काय करू शकतो याची आपल्यालाही खरी कल्पना नसते. कारण आपल्याच चुकीच्या विश्वासाचं कुंपण आपण लावून घेतलेलं असतं. ते काढायचाच अवकाश, कोणत्याही यशस्वी व्यक्तींपेक्षा एकही कमी गुण आपल्यामध्ये नसतो. फक्त हवा तो स्वतवरचा विश्वास! ईश्वराने प्रत्येकाला बनवताना एकसारखे तंत्र वापरले आहे. म्हणजे नाक, डोळे, कान, हात, पाय किंवा शरीरांतर्गत अवयव सगळे ज्या त्या ठिकाणी असतात. फरक आहे तो फक्त विचारांचा. आपण काय पद्धतीने विचार करतो, कशावर विश्वास ठेवतो याचा. बाकी सगळं जर सारखं मिळालेलं असेल तर योग्य त्या पद्धतीनं विचार करणं हे आपलंच काम नाही का? तसेच स्वतःला फायदेशीर ठरतील अशाच गोष्टींवर विश्वास ठेवायचा हेही जाणीवपूर्वक लक्षात ठेवलं की, बऱयाच गोष्टी सोप्या होऊन जातील.