‘विवेकानंद’ अनुभवलेला तो क्षण!

>> प्रा. सुहास पटवर्धन

न्यूयॉर्क आणि लॉस एंजेलिस यांनतर शिकागो हे अमेरिकेतील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर. तेथील गगनचुंबी इमारती हे एक चित्र आणि तेथून केवळ दहा मिनिटांच्या अंतरावर असलेल्या 130 वर्षांपूर्वीच्या ऐतिहासिक वास्तूचे दुसरे चित्र. एकशे तीस वर्षांपूर्वी अवघ्या जगाचे लक्ष या इमारतीकडे लागले होते. जगभराच्या कानाकोपऱ्यातून आलेली धर्म प्रचारक, तत्त्वज्ञ व विद्वानांची मांदियाळी येथे जमली होती. याच वास्तूत जागतिक सर्व धर्म परिषद भरली होती. स्वामी विवेकानंद यांचे अखिल मानवजातीला सहिष्णुतेचा संदेश देणारे ऐतिहासिक भाषण झाले ते याच वास्तूत. “Sisters & brothers of America” असं म्हणताच टाळ्यांचा प्रचंड कडकडाट ऐकला तो याच वास्तूने. 11 सप्टेंबर 1893 रोजी. आज ती इमारत ‘आर्ट इन्स्टिट्यूट ऑफ शिकागो’ (Art Institute of Chicago) या नावाने ओळखली जाते. स्वामी विवेकानंद यांच्या पदस्पर्शाने पुनित झालेली वास्तू पाहण्याचे भाग्य मला लाभले चार महिन्यांपूर्वी.

ज्या सभागृहात स्वामी विवेकानंद यांनी आपले मौलिक विचार मांडले ते सभागृह सध्या रिकामेच असते. जुन्या आठवणींना उजाळा मिळावा व तेव्हाचे चित्र डोळ्यांसमोर यावे म्हणून जुनाट लाकडी खुर्च्या तेथे पाहावयास मिळतात. इतर काहीच पाहण्यासारखे नसल्याने तो भाग नेहमी बंदिस्त असतो. नूतनीकरण केलेल्या इमारतीचा बराचसा भाग सध्या कला दालन म्हणून वापरला जातो व तेथे चित्रकारांच्या कलाकृतींचे प्रदर्शन वेळोवेळी भरत असते. त्यामुळे तेथे भेट देणारे रसिक पर्यटक आकर्षक कलाकृती पाहण्याच्या उद्देशाने आलेले असतात.

विवेकानंद यांच्या चरित्राचा विशेष अभ्यासक असल्याचे सांगून तेथील व्यवस्थापन अधिकाऱ्यांना विशेष विनंती केल्याने आम्हाला एरवी तो बंदिस्त असलेला वास्तूचा ‘ऐतिहासिक’ भाग पाहायला मिळाला आणि मी धन्य झालो. सध्या ते सभागृह Fullerton Hall म्हणून ओळखले जाते. जागतिक सर्व धर्म परिषदेच्या वेळी त्याला Columbus Hall असे नाव होते.

स्वामी विवेकानंद यांनी ज्या व्यासपीठावरून दिव्य उद्गार काढले त्या व्यासपीठावर मी नतमस्तक झालो. सुवर्णाक्षरांनी आयुष्याच्या वहीत चिरंतन जपून ठेवावा असा तो क्षण होता.

[email protected]