बहुचर्चित नगर-बीड-परळी रेल्वे नगरहून मराठवाड्यात धावली; चाचणी यशस्वी

मराठवाड्यातील प्रवाशांची प्रतीक्षा आता लवकरच संपणार आहे. प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. मराठवाड्यातील बहुचर्चित नगर-बीड-परळी रेल्वेची यशस्वी चाचणी पार पडली आहे. अमळनेर ते विधनवाडी दरम्यान शुक्रवारी या बहुप्रतीक्षित रेल्वेची चाचणी घेण्यात आली.

लवकरच नगर ते बीडपर्यंत लोहमार्गाचे काम पूर्ण होणार असून मराठवाड्यातील प्रवाशांचा प्रवास सोपा व सुखकर होणार आहे. गेल्या सात वर्षांपासून या रेल्वे मार्गाचे काम सुरू आहे. यापूर्वी नगर ते नारायणडोह, नारायणडोह ते सोलापूर वाडी, सोलापूर वाही ते आष्टी, आष्टी ते अंमळनेर या मार्गाची चाचणी घेण्यात आली.

आतापर्यंत एकूण 95 किलोमीटर अंतराची चाचणी पूर्ण करण्यात आली आहे. शुक्रवारी झालेल्या चाचणीमध्ये या रेल्वे लोहमार्गाचा नेमका वेग काढण्यात आला. विधनवाडी ते परळीपर्यंतचा टप्पा पूर्ण होण्यास अजून एक वर्ष कालावधी लागू शकतो अशी माहिती उपमुख्य अभियंता बांधकाम राकेश कुमार यादव यांनी दिली.

यावेळी रेल्वे सुरक्षा आयुक्त मनोज अरोरा, मुख्य प्रशासकीय अधिकारी ए के पांडे, मुख्य अभियंता राजकुमार वानखेडे, उप मुख्य अभियंता राकेश कुमार यादव, सहाय्यक कार्यकारी अभियंता एस सुरेश, कार्यकारी अभियंता अवधेश मीना, सिनिअर सेक्शन इंजिनिअर विद्याधर धांडोरे, सिनिअर सेक्शन इंजिनिअर सत्येंद्र रा. कुवर, सिनिअर सेक्शन संजय श्रीवास्तव एक्झिक्युटीव्ह, इंजिनिअर आदी उपस्थित होते.