घरापासून शाळेपर्यंत विद्यार्थ्यांचा प्रवास होणार सुरक्षित; बसचालक, मुख्याध्यापकांना आरटीओ देणार टिप्स

बदलापूरमधील प्रितिनिधीमध्ये दोन चिमुरडींवर झालेल्या लैंगिक अत्याचारानंतर जिल्ह्याचे आरटीओ खातेही खडबडून जागे झाले आहे. घर ते शाळा आणि शाळा ते घर हा विद्यार्थ्यांचा प्रवास सुरक्षित व्हावा यासाठी बसचालक व मुख्याध्यापकांना टिप्स देण्यात येणार आहेत. तसेच नियमावली व सूचनांचे काटेकोर पालन व्हावे यासाठी आरटीओने पुढाकार घेतला आहे. शनिवार 28 सप्टेंबर रोजी डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात ठाणे जिल्ह्यातील खासगी शाळांचे मुख्याध्यापक, बसचालक आणि संबंधित अधिकारी यांची एकत्रित बैठक होणार आहे.

शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या बस वाहनचालक आणि खासगी शाळेतील मुख्याध्यापक यांना बैठकीमध्ये मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील सर्व महापालिका, जिल्हा परिषद याचबरोबर खासगी शाळा, महाविद्यालयाला ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाने पत्र पाठवले आहे. विद्यार्थी वाहतूक संघटनेच्या चालक आणि मालकांना हजर राहण्याच्या सूचना दिल्या असल्याची माहिती ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाचे प्रमुख हेमांगिनी पाटील यांनी दिली.

वाहनचालकांची होणार आरोग्य तपासणी
सर्व शालेय बसचालकांची आरोग्य तपासणी करून ते पूर्णपणे तंदुरुस्त आहेत का, याबाबत खात्री करून घेण्यात येणार आहे. तसेच बसचालकांवरील मानसिक ताण कमी व्हावा याकरिता त्यांना मानसोपचार तज्ज्ञांच्या मार्फत मार्गदर्शनदेखील करण्यात येणार आहे. चित्रफीत दाखवण्यात येणार वारंवार होणारे अपघात आणि मुलांवरील अत्याचार अशा घटना रोखण्याकरिता आरटीओकडून सामाजिक प्रबोधन करणारी चित्रफीत दाखवण्यात येणार आहे. जेणेकरून समाजामध्ये सकारात्मक बदल घडवण्याचा मुख्य हेतू असल्याचे हेमांगिनी पाटील यांनी सांगितले.