Uddhav Thackeray News – शक्ती विधेयकाची शक्ती दाखवण्याची गरज, विनाविलंब कडक कारवाई हवी! उद्धव ठाकरे ठाकरे कडाडले

बदलापूर शहरातील शाळेत चार वर्षांच्या दोन मुलींवर अत्याचार झाल्यानंतरही पोलिसांकडून आरोपी आणि शाळेला पाठीशी घातले जात असल्याच्या निषेधार्थ बदलापूरकर रस्त्यावर उतरले आहेत. बदलापुरात कडकडीत बंद आहे. या प्रकरणावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सरकारवर कडाडले. आरोपी कुणीही असो कडक कारवाई व्हायला हवी अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

उद्धव ठाकरे म्हणाले की, बदलापूरमधली घटना दुर्दैवी आहे. अशा घटना देशात वारंवार घडत आहेत. ठराविक राज्यांच्या ठराविक घटनांचं राजकारण केलं जातं. संजय राऊत यांनी सामनच्या अग्रलेखात म्हटलं आहे की, एका बाजूला लाडकी बहीण योजना आणायची आणि दुसरीकडे बहीण आणि मुलींवर अत्याचाऱ्याच्या घटना घडत आहेत. देशात कुठेही अशी घटना घडता कामा नये आणि या घटनेतील आरोपींना लवकरात लवकर शिक्षा व्हावी अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली.

तसेच दिल्लीत निर्भया प्रकरणात सर्व आरोपींना अटक केली, पण त्यांना किती वर्षांनी त्यांना शिक्षा मिळाली? या दिरंगाईला जबाबादार कोण? एखाद्या महिलेवर अत्याचार करण्यासाठी तो आरोपी जबाबदार असतो. तसंच न्यायनिवाडा करून त्याच्या शिक्षेवर अंमलबजावणी करताना दिरंगाई करणाऱ्यांनाही जबाबदार धरले पाहिजे. हे जर झालं तरच आणि तरच अशा गोष्टींना आळा बसेल असे उद्धव ठाकरे म्हणाले.

अशा घटनांवर राजकारण होता कामा नये. हाथरस, उन्नाव, राजस्थान, बदलापूर मध्ये घडलेल्या गुन्ह्यातील आरोपींची सुटका होता कामा नये. अशा घटनांविरोधात जात, धर्म बाजूला सारून एकत्र आलो तरच आपल्या देशातल्या मुली सुरक्षित राहतील. तरच आपण म्हणू शकू की माझ्या राज्यातली महिला लाडकी बहीण आहे. शक्ती विधेयक आम्ही आणत होतो, त्याचा मसूदा आम्ही तयारही केला होता. सर्वांना कल्पना आहे, तेव्हा कोरोनामुळे एक आणि दोन दिवसांचे अधिवेशन होत होते. हे विधेयक आम्हाला मंजूर करता आले नाही कारण आमचे सरकार गद्दारी करून पाडण्यात आलं. ज्यांनी आमचं सरकार गद्दारी करून पाडलं, आणि हे विधेयक लटकवून ठेवलं. आताशक्ती विधेयकाची शक्ती या गुन्हेगारांना दाखवून देण्याची त्यांची जबाबदारी आहे असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले.

या शाळेचा विश्वस्त भाजपचा कार्यकर्ता आहे असं मी ऐकलं पण यात कुणीही राजकारण करू नये. आरोपी कुणीही असो त्यावर विनाविलंब कारवाई झाली पाहिजे. काही दिवसांपूर्वी आपल्याकडे हिच अँड रन घडलं होतं. मिहीर शहाने त्या महिलेला फरपटत नेलं, त्याला काय निबंध लिहायला सांगितला का? जर या घटनेत भाजपचा कार्यकर्ता आरोपी असेल तर त्यांच्याकडून निबंध लिहून सोडून देणार का? संपूर्ण जगाचं या घटनेकडे लक्ष आहे. मी पुन्हा सांगतोय कुठलेही राजकारण न करता लवकरात लवरक कारवाई झाली पाहिजे. ही कारवाई म्हणजे फक्त गुन्हा दाखल करून अटक केली, वर्षानुवर्षे केस सुरू आहे, निकाल लागला, त्या निकालाची अंमलबजावणी झाली नाही असे होता कामा नये. अशा नराधमांवर जरब बसला पाहिजे तरच आणि तरच आपल्या बहिणीला लाडकी बहीण म्हणू असेही उद्धव ठाकरे यांनी नमूद केले.