सूरतमध्ये गणेशोत्सवाला गालबोट; समाजकंटकांकडून गणेश मंडळावर दगडफेक, 6 सूत्रधारांसह 33 जणांना अटक

देशभरात उत्साहात सुरू असलेल्या गणेशोत्सवाला गुजरातमधील सूरत येथे गालबोट लागण्याची घटना घडली आहे. सूरतमधील सैयदपुरा येथे समाजकंटकांनी गणेश मंडळावर दगडफेक केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. त्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला असून 6 सूत्रधारांना एकूण 33 जणांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

इंडिया टूडेने दिलेल्या वृत्तानुसार, सूरतच्या लालगेट भागातील सैयदपुरा येथे गणेश मंडळावर दगडफेक झाली. यानंतर हिंदू संघटना रस्त्यावर उतरल्या आणि बघताबघता हजारो लोकांनी सैयदपुरा पोलीस स्थानकाला घेराव घातला. आरोपींना अटक करा ही मागणी जमावाने रेटू धरली. परिस्थिती बिकट होत असल्याची जाणीव होताच या भागातील आमदारानेही घटनास्थळी धाव घेतली. गुजरातचे गृहमंत्री हर्ष सांघवी यांनीही याची दखल घेतली. त्यानंतर पोलीस अॅक्शनमध्ये आली आहे.

सूरतचे पोलीस आयुक्त अनुपम सिंह गहलोत यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, अल्पवयीन मुलांनी गणेश मंडळावर दगडफेक केली. त्यानंतर परिसरात तणाव निर्माण झाला. याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मुलांना ताब्यात घेतले. घटनास्थळी जमलेला जमाव आक्रमक झाल्याने लाठीचार्ज करण्यात आला, तसेच जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. या घटनेमध्ये सहभागी असलेल्या सर्व आरोपींना अटक करण्यात आली असून परिसरात 1000 पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

सूरतच्या सैयदपुरा भागातील गणेश मंडळावर दगडफेक झाल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत 6 सूत्रधारांसह या घटनेला हवा देणाऱ्या 27 जणांना अटक केली आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून शांतता भंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा गृहमंत्री हर्ष सांधवी यांनी दिला. सांघवी यांनी मध्यरात्री अडीचच्या सुमारास या भागाचा दौराही केला.