शेअर मार्केटमध्ये गुंतवा, भरघोस परतावा मिळवा, पेडर रोड येथील व्यावसायिक महिलेला लाखो रुपयांचा गंडा

शेअर मार्केटमध्ये गुंतवा आणि चांगला परतावा मिळवा, अशी बतावणी करत एका सायबर भामटय़ाने पेडर रोड येथे राहणाऱया व्यावसायिक महिलेसह तिच्या बहिणीला लाखो रुपयांचा गंडा घातला. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच दक्षिण सायबर पोलिसांनी तपास करत आरोपीला पकडले.

कमल (नाव बदललेले, 59) या महिला पेडर रोड येथे राहत असून त्यांचा कपडय़ांचा व्यवसाय आहे. त्यांच्या संपका&त एक जण आला आणि त्याने कमल यांना बी 9 मार्शल पॅपिटल या शेअर मार्केटशी संबंधित असलेल्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये सामील करून घेतले. मग गुंतवणूक केल्यास जास्त परतावा मिळेल असे आमिष दाखवून वेगवेगळय़ा बँक खात्यांवर पैसे पाठवण्यास सांगितले. झटपट पैसा मिळणार असल्याने कमल यादेखील आरोपीच्या भूलथापांना बळी पडल्या आणि त्यांनी आरोपींनी सांगितल्याप्रमाणे वेगवेगळय़ा बँक खात्यांत टप्प्याटप्प्याने 13 लाख 50 हजार रुपये पाठवले. इतकेच नाही तर कमल यांची बहीण विमल (नाव बदलेले) यांनीदेखील 18 लाख आरोपींनी सांगितलेल्या बँक खात्यांवर पाठवले. दरम्यान आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच दोघींनी सायबर पोलिसांकडे तक्रार केली. याप्रकरणी दक्षिण सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर वरिष्ठ निरीक्षक नंदपुमार गोपाळे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक भोये व पथकाने तपास सुरू केला. पथकाने पैसे पाठवलेल्या बँक खात्याचा तांत्रिक अभ्यास करून बोरिवलीच्या गोराई येथे राहणाऱया सिद्धार्थ नावाच्या भामटय़ाला पकडले. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.