श्री विठ्ठल मंदिराच्या तळघरात सापडल्या मूर्ती

कोटय़वधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र पंढरपुरातील श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदिराचे सुशोभिकरणाचे काम सुरू असताना एक तळघर सापडले. पुरातत्व विभाग आणि मंदिर समितीच्या कर्मचाऱयांनी तळघरात प्रवेश केला. या तळघरात देव-देवतांच्या सहा मूर्ती, पादुका आढळून आल्या आहेत.

श्री विठ्ठल मंदिराच्या आवारातील हनुमान गेटजवळील जुनी शहाबादी फरशी काढून तेथे दगडी फरशी बसविण्याचे काम सुरू आहे. जुन्या फरशीखाली तळघर आढळले. हे वृत्त वाऱयासारखे पसरले. तळघर पाहण्यासाठी भाविकांची गर्दी उसळली. तळघरात काय आहे याबाबत अनेक तर्कविर्तक लावले गेले. सायंकाळी पुरातत्व विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱयांच्या उपस्थितीत मंदिर समितीच्या कर्मचाऱयांनी तळघरात प्रवेश केला आणि याचा उलगडा झाला.

पाच फूट बाय सहा फूट तळघर

पाच फूट बाय सहा फूट असे हे तळघर आहे. या तळघरात जाण्यासाठी एकच मार्ग आहे. यामध्ये सापडलेल्या मूर्ती साधारणपणे 16 व्या शतकातील असल्याचे पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक विलास वहाने यांनी सांगितले. अधिक संशोधनानंतर मूर्तींचे आयुर्मान काढले जाईल असे ते म्हणाले.

श्री महिषासुरमर्दिनी देवी, श्री विष्णूची मूर्ती

– तळघरात सहा मूर्ती सापडल्या. श्री महिषासुरमर्दिनी देवीची मूर्ती अत्यंत सुबक आहे. देवीच्या हातामध्ये शंख, चक्र, गदा, कमळ आहे. पाषाण दगडातील ही मूर्ती आहे.
– श्री विष्णूच्या दोन मूर्ती आहेत. तीन ते साडेतीन फुट उंचीची मूर्ती अतिशय सुंदर आणि सुस्थितीत आहे.
– अन्य दोन छोटय़ा मूर्ती असून, एक पादुका, काही जुनी नाणी, बांगडय़ा, चुडे आदी वस्तू सापडल्या आहेत.