पोलीस भरतीसाठी आलेल्यांवर रेल्वे प्लॅटफॉर्मवर झोपण्याची वेळ; मिंधेंच्या राजवटीत लाडकी बहीण, लाडका भाऊ वाऱ्यावर

राज्याच्या ग्रामीण भागातून पोलीस भरतीसाठी मुंबईत आलेल्या उमेदवारांना आसराच नसल्याने मुंबईतल्या फुटपाथवर आणि चर्चगेट रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर बेघरांसारखे राहण्याची वेळ आली आहे. यामध्ये खासकरून महिला उमेदवारांचे अतोनात हाल होत आहेत. स्वच्छतागृह नाही, झोपायला जागा नाही आणि कपडे बदलण्यासाठी खोली नाही, अशी अवस्था सध्या या भावी पोलिसांची झाली आहे.

मरीन ड्राइव्ह येथील विद्यापीठाच्या मैदानात पोलीस भरतीसाठी मैदानी चाचणी सुरू आहे. दररोज हजारो उमेदवार शारीरिक चाचणीसाठी तेथे हजेरी लावत आहेत; परंतु मैदानाबाहेर त्यांना किमान बसण्याची व्यवस्था नाही. पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही, फिरते शौचालय उपलब्ध नसल्याने पुरती गैरसोय होत आहे. त्यात पावसाचा मारा सुरू असल्याने जायचे कुठे, आसरा कुठे घ्यायचा या विचाराने उमेदवार व त्यांचे नातेवाईक त्रस्त झाले आहेत. ही बाब समजताच शिवसेनेचे दक्षिण मुंबई विभागप्रमुख संतोष शिंदे यांनी पदाधिकाऱ्यांसह तेथे धाव घेऊन उमेदवारांना सामोरे जावे लागत असलेल्या समस्यांना वाचा फोडली. प्रशासनाचा ढिसाळ व भावनाशून्य कारभार संतोष शिंदे यांनी चव्हाटय़ावर आणला. मात्र तरीदेखील प्रशासन ढिम्म असून त्यांना कशाची काही पडलेली नसल्याचे चित्र आहे. मैदानात उपलब्ध असलेल्या फिरत्या शौचालयांचीही दुरवस्था झाली आहे. सफाई नसल्याने तिथे जायचे कसे, असा प्रश्न पडत असल्याचे उमेदवार सांगतात.

शिवसेनेकडून पाठपुरावा मदतीचा हात

उमेदवारांसाठी कुठलीच उपाययोजना नसल्याचे कळताच विभागप्रमुख संतोष शिंदे यांनी त्या ठिकाणी धाव घेऊन पिण्याचे पाणी व फिरत्या शौचालयाची सुविधा उपलब्ध करून द्यावी असे आवाहन पालिकेच्या ए वॉर्डचे सहाय्यक आयुक्त मोरे यांना केले; परंतु वरून आदेश येत नसल्याने कुठलीच सुविधा पुरवू शकत नाही असे मोरे सांगत असल्याचे शिंदे म्हणाले. त्यामुळे शिवसैनिकांनी शांत न बसता आज बिस्कीट व पिण्याच्या पाण्याचे वाटप केले. प्राथमिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करत आहेत.

नागरिकांकडून नाश्ता पाणी

मरीन ड्राइव्ह हा परिसर उच्चभ्रू वस्तीचा आहे. त्यामुळे तेथे सार्वजनिक शौचालय, खाण्यापिण्याची दुकाने आदी कसलीच मुबलक सुविधा नाही. परिणामी राज्याच्या विविध भागांतून येणाऱ्या गरीब कुटुंबातील तरुणींची मोठी गोची होत आहे. इतके भयानक वास्तव असतानाही प्रशासनाला मात्र याचे काहीच सोयरसुतक नाही. त्याउलट परिसरातील नागरिकांमधील माणुसकी जागी झाली. नागरिकांनी स्वखर्चाने पुरीभाजीचा नाश्ता व पाण्याची बाटली प्रत्येक उमेदवाराला देण्यास सुरू केले आहे.

व्हिडीओ व्हायरल

पोलीस भरतीसाठी आलेल्या उमेदवारांनी चर्चगेट भागातील फुटपाथवर पथारी पसरली आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी त्याचा व्हिडीओ समाजमाध्यमावर टाकला आहे.

मुंबईत पोलीस भरतीसाठी आलेल्या मुली यामध्ये दिसत आहेत. मुंबईत आलेल्या मुलींसाठी एक रात्र राहण्याची व्यवस्था सरकार आणि पोलीस प्रशासन करू शकत नाही? पाऊस पडत असताना या मुली कुठे झोपतील?

त्यांच्या सुरक्षेचे काय? वॉशरूमचे काय? बेजबाबदार नियोजन आहे. सरकारने तातडीने मुलींची राहण्यासाठी हॉलची व्यवस्था करावी, असे विजय वडेट्टीवार यांनी ‘एक्स’च्या पोस्टमध्ये नमूद केले आहे.