मिंधे-भाजप राजवटीने मुंबईकरांचे हाल करण्याचा निश्चयच केला आहे का? आदित्य ठाकरे यांचा हल्लाबोल

घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या कंत्राटदार मित्रांसाठी विविध मार्गांनी मुंबई महानगरपालिकेची तिजोरी रिकामी केली जातेय, उधळपट्टी सुरू आहे. मात्र, मुंबईची जीवनवाहिनी असणाऱया ’बेस्ट’ला आर्थिक सहाय्य करायला महापालिकेने नकार दिला आहे. त्यामुळे बेस्टला भाडेवाढ करावी लागणार आहे, ज्याचा त्रास दररोज बसने प्रवास करणाऱया सामान्य मुंबईकरांना होणार आहे. मुंबईची लूट करू पाहणाऱया मिंधे-भाजप राजवटीने सामान्य मुंबईकरांचे हाल करण्याचा निश्चयच केलेला दिसतो, असा हल्लाबोल शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

मुंबई महापालिकेच्या वतीने मुंबईकरांना अत्यंत माफक दरात शिक्षण, आरोग्य, पाणी यासह अनेक मूलभूत सोयीसुविधा पुरवल्या जातात. बेस्टच्या रूपाने सार्वजनिक वाहतूक सुविधाही अत्यंत माफत दरात पुरवली जाते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून बेस्ट तोटय़ात असून मुंबई महापालिकेकडून बेस्टला निधी देऊन आधार दिला जात आहे. मात्र, आता सत्तेत असलेल्या मिंधे-भाजप सरकारच्या इशाऱयावर नाचणाऱया मुंबई महापालिकेने ही मदत देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे बेस्ट भाडेवाढ अटळ आहे. त्यावर आदित्य ठाकरे यांनी सोशल मीडिया ’एक्स’वर संताप व्यक्त केला आहे. ते म्हणाले, संकटात असलेल्या बेस्टला का नाही मदत देत? का नाही सामान्य मुंबईकरांचा विचार करत? मुंबईचे शोषण करू पाहणारे मिंधे-भाजप अजून किती काळ आमच्या मुंबईची लूट सुरू ठेवणार आहेत? सामान्य मुंबईकरांना कमी लेखू नका, आमचा अंत पाहू नका, असा इशारा आदित्य ठाकरे यांनी दिला आहे.