ठाण्यात निवडणूक काळात बनावट दारूची ‘झिंग’, 1 कोटीचा मुद्देमाल जप्त; 180 जणांना अटक, 279 गुन्हे दाखल

liquor Liqueur
फोटो प्रातिनिधीक

ऐन विधानसभा निवडणुकीच्या काळात ठाण्यात बनावट दारूची झिंग वाढली असल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ठाणे फ्लाईंग स्कॉडने कंबर कसली आहे. आचारसंहिता लागू झाल्यापासून अवघ्या 21 दिवसांत 1 कोटी 12 लाख लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला, तर यामध्ये 180 जणांना अटक करण्यात आली असून 279 गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिली.

राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून 15 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबर या कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभागातील पथकाने रसायन, हातभट्टी, देशी मद्य, विदेशी मद्य, बीयर, वाईन, ताडी आदींवर कारवाई केली. ठाणे जिह्यात खाडीकिनारी गावठी दारूच्या हातभट्टय़ा उद्ध्वस्त केल्या. भरारी पथकाकडून 92 भट्टय़ांवर कारवाई करण्यात आली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक प्रवीणकुमार तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन विशेष भरारी पथकाची निर्मिती करण्यात आली असून या पथकात एक निरीक्षक, दोन उपनिरीक्षक, चार कॉन्स्टेबल, एक वाहक अशा आठ जणांचा समावेश आहे.