विधानसभेला एका केंद्रावर 1500 ऐवजी 1200 मतदारांची व्यवस्था, मुंबईत 10 हजार 111 मतदान केंद्रे

लोकसभा निवडणुकीत मतदारांच्या तुलनेत मतदान केंद्रांची संख्या कमी होती. त्यामुळे अनेक ठिकाणी लांबच लांब रांगा लागल्या. भरउन्हात उभे राहावे लागल्याने कंटाळून मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवली होती. राज्य निवडणूक आयोगाने त्यातून धडा घेत आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान केंद्रांची संख्या वाढवली आहे. मुंबईत येत्या निवडणुकीत 10,111 मतदान केंद्रे असणार आहेत. प्रत्येक केंद्रावर 1200 मतदार मतदान करू शकणार आहेत.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या तुलनेत मतदान केंद्रांच्या संख्येत 218 ने वाढ झाली आहे. यामध्ये प्रत्येक मतदान केंद्राच्या ठिकाणी पूर्वी असणारी सरासरी 1500 मतदारांची संख्या ही आता सरासरी 1200 पर्यंत असेल. त्यामुळे मतदानाचे प्रमाण आणि वेग वाढण्यास मदत होणार आहे.

मतदान केंद्र जाणून घ्या

लोकसभेला मुंबई शहर जिह्यामध्ये 2 हजार 509 मतदान केंद्रे होती. मुंबई उपनगर जिह्यात ही संख्या 7 हजार 384 होती. आगामी निवडणुकीत मुंबई शहरात 2 हजार 537 आणि उपनगरांमध्ये 7 हजार 574 मतदान केंद्रे असणार आहेत. निवडणूक आयोगाने मतदारांच्या सुविधेसाठी ‘आपले मतदान केंद्र जाणून घ्या’ ही जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. याअंतर्गत मतदार नोंदणी अधिकारी मतदारांच्या घरी जाऊन मतदान केंद्रांच्या ठिकाणामध्ये झालेल्या बदलांची माहिती देणार आहेत.