ऑफिसला येण्या- जाण्यासाठी जेट विमान, स्टारबक्सच्या सीईओवर खैरात

स्टारबक्सचे नवे सीईओ ब्रायन निकोल यांच्यावर कंपनीने भरमसाठ पगारासोबत अन्य सुविधांची खैरात केली आहे. निकोल यांचे घर ऑफिसपासून 1600 किलोमीटर दूर आहे. परंतु, ऑफिसला येण्यासाठी कंपनी त्यांना जेट विमान देणार आहे. निकोल जेट विमानाने ऑफिसला येणार आहेत. हा सर्व खर्च कंपनी करणार आहे. ब्रायन यांचे घर कॅलिपहर्नियाच्या न्यूपोर्ट येथे आहे. तर स्टारबक्सचे मुख्यालय वॉशिंग्टन शहरातील सिएटल येथे आहे. या दोन्ही शहरांतील अंतर जवळपास 1600 किमी दूर आहे. ब्रायन हे कंपनी शिवाय, अन्य दुसऱ्या शहरे आणि देशांतही प्रवास करू शकतील. या सर्व प्रवासाचा खर्च कंपनी करणार आहे. कंपनीच्या हायब्रिड पॉलिसीनुसार, ब्रायन यांना आठवडयात कमीत कमी तीन दिवस ऑफिसला यावे लागणार आहे. सीईओ पद सांभाळल्यानंतर ब्रायन यांनी आतापर्यंत ऑफिस ज्वॉइन केले नाही. ते पुढील महिन्यात पदभार स्वीकारतील.

भरमसाठ पगार

50 वर्षीय ब्रायन यांना कोटय़वधी रुपयांचा पगार दिला जाणार आहे. स्टारबक्स कंपनी त्यांना वर्षाला 113 मिलियन डॉलर म्हणजेच जवळपास साडेनऊ कोटी रुपये वार्षिक पॅकेज देणार आहे. याशिवाय कंपनीच्या शेअरमध्ये भागीदारीसुद्धा मिळेल. ही 23 मिलियन डॉलरपर्यंत असेल.