वाई तालुक्याचा पश्चिम भाग हा दुर्गम असून, या भागातील विस्कळीत बससेवेमुळे विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. वेळेत बसच्या फेऱ्या होत नसल्याने शैक्षणिक नुकसान होत आहे. वाई आगारातील अधिकाऱ्यांच्या अनागोंदी कारभारामुळे विद्यार्थ्यांना फटका बसत आहे. एसटी बस हेच पश्चिम भागातील दळणवळणाचे साधन असून, बसफेऱ्या सुरळीत कराव्यात, अशी मागणी या भागातील नागरिकांकडून होत आहे
वाई तालुक्यातील जांभळी, आकोशी, कोंढवली, कोंढावळे, वासोळे, जोर, गोळेवाडी या दुर्गम भागांतून वाईला विद्यार्थी शिक्षणासाठी जातात. या विद्यार्थ्यांना एसटी हा एकमेव आधार आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी पास काढलेले आहेत. पण गावात एसटी वेळेवर येत नसल्याने विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मुकावे लागत आहे. तसेच पासची रक्कम फुकट जात आहे. याचे भान आगार व्यवस्थापनाला राहिलेले नाही. वाई आगार व्यवस्थापनाकडे कसल्याही प्रकारचा ताळमेळ नसल्याने ग्रामीण भागातील एसटीचे वेळापत्रक कोलमडलेले आहे. यासाठी वरिष्ठांनीच याकडे लक्ष घालण्याची गरज निर्माण झाली आहे.
ज्याप्रमाणे विद्यार्थ्यांना त्रास होत आहे तसेच चालक व वाहनांनाही अडचणींना सामोरे जावे लागत आहे. ज्या बसफेऱ्या या भागात सुरू आहेत, त्या बसेसही नादुरुस्त आहेत. तसेच डिझेलची वानवा असल्याने मध्येच बसेस बंद पडण्याचे प्रमाण वाढले आहे. बसफेऱ्या वेळेत नसल्याने या भागातील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडून गेलेली आहे. यामुळे ग्रामीण भागातील वाड्यावस्त्यांवरील विद्यार्थ्यांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. यामुळे आर्थिक भुर्दंड बसत आहे.