गॉलवर जय श्रीलंका, सलग पाचव्यांदा गॉलवर न्यूझीलंडला धूळ चारली

रोमहर्षक लढतीची अपेक्षा होती, पण पाचव्या दिवशी थरारक असे काही घडलेच नाही. न्यूझीलंडला विजयासाठी 68 धावा हव्या होत्या आणि यजमान श्रीलंकेला 2 विकेटची गरज होती. श्रीलंकेने गॉलवर न्यूझीलंडविरुद्ध आपले शतप्रतिशत यश कायम राखताना अवघ्या 22 चेंडूंत चार धावा देत दोन्ही विकेट टिपले आणि पहिली कसोटी 63 धावांनी जिंकली. दोन सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतलेल्या श्रीलंकेने सलग पाचव्यांदा गॉल स्टेडियमवर न्यूझीलंडला धूळ चारण्याचा पराक्रम केला.

काल 91 धावांवर नाबाद असलेल्या रचीन रवींद्रकडून आजही झुंजार खेळाची अपेक्षा होती. कालही त्याने एकहाती किल्ला लढवताना न्यूझीलंडच्या विजयाच्या आशा जिवंत ठेवल्या होत्या. मात्र आज अवघी एक धाव करून तो दिवसाच्या दुसऱ्याच षटकात बाद झाला. या कसोटीत जबरदस्त फॉर्मात असलेल्या प्रबाथ जयसूर्याने रचीनला पायचीत करून लंकेच्या विजयाचा मार्ग मोकळा केला. रचीनने 92 धावांची खेळी केली. त्याचे कसोटी शतकही हुकले आणि तो संघाला विजयासमीपही पोहचवू शकला नाही. त्यानंतर पुढच्याच षटकात जयसूर्याने विलियम ओरुरकेची यष्टी वाकवून लंकेच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. त्याने या विकेटसह डावात पाच विकेट टिपण्याचाही पराक्रम केला. 68 धावांत अर्धा संघ गारद करणाऱ्या जयसूर्याने सामन्यात 204 धावांत 9 विकेट टिपले. तोच लंकेच्या विजयाचा शिल्पकार ठरला.

गॉलवर नॉनस्टॉप विजय

गेल्या काही वर्षांत श्रीलंकेचे जास्त सामने गॉलवरच खेळविले जात आहेत आणि हे स्टेडियम लंकेसाठी लकीसुद्धा ठरतेय. गेल्या दोन-तीन वर्षांत गॉलवर नऊ कसोटी खेळले गेले होते आणि त्यापैकी सहा कसोटीत लंका जिंकली आणि तीन सामन्यांत पराभूत झालीय. गेल्या तीन वर्षांत लंकेने या मैदानावर वेस्ट इंडीज, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान आणि आयर्लंड या संघाला हरवले होते. आता त्यात न्यूझीलंडचीही भर पडली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, या मैदानावर लंका आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामने खेळले गेले आहेत आणि या पाचही सामन्यांत श्रीलंकेनेच दणदणीत विजय नोंदवले आहेत. याचाच अर्थ, गॉलवर श्रीलंका नॉनस्टाप आहे. 1998 सालापासून उभय संघांत गॉलवर कसोटीचे द्वंद्व रंगले जात असून यावर श्रीलंकेने मोठेच विजय मिळवले आहेत.