देशाच्या लेकीच्या पाठीत खंजीर कोणी खुपसला, या षडयंत्रामागे कोण आहे? रणदीप सुरजेवाला यांचा संतप्त सवाल

हिंदुस्थानची स्टार कुस्तीपटू विनेश फोगाटने पॅरिस ऑलिम्पिकच्या फायनलमध्ये धडक दिली. मात्र, विनेश फोगाटला 2024 च्या पॅरिस ऑलिम्पिकसाठी अपात्र ठरवण्यात आले आहे. त्यामुळे देशभरात संताप व्यक्त होत आहे. तसेच ऑलम्पिकवर बहिष्कार टाकण्याची मागणी होत आहे. या निर्णयाचे पडसाद संसदेतही उमटले. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सिंग सूरजेवाला यांनी याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करत एनडीए सरकारवर हल्लाबोल केला आहे.

रणदीपसिंग सुरजेवाला यांनी एक्सवर पोस्ट करत सरकारला घेरले आहे. विनेश फोगटच्या विरोधात रचलेल्या कटाचा एक दिवस पर्दाफाश होईल. हरियाणाच्या लेकीच्या आणि देशाच्या पाठीत खंजीर खुपसणारा कोण आहे? द्वेषपूर्ण कटामागे कोण आहे? असे संतप्त सवाल सूरजेवाला यांनी केले आहेत. भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगाटला पॅरिस ऑलिम्पिकमधील अंतिम सामन्यात भाग घेण्यापूर्वी अपात्र ठरविण्यात आले. रणदीप सुरजेवाला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह केंद्र सरकार आणि क्रीडामंत्र्यांवर आरोप करत प्रश्न उपस्थित केले आहेत. यामागे द्वेषपूर्ण षडयंत्र असल्याचा आरोप त्यांनी केला.

विनेश फोगाटच्या विरोधात रचलेल्या कटाचा एक दिवस पर्दाफाश होईल. षड्यंत्राचे हे चक्र खंडित राहील. अशा परिस्थितीत भारत सरकार कुठे आहे? देशाचे क्रीडा मंत्री कुठे आहेत? देशाचे पंतप्रधान कुठे आहेत? प्रश्न गंभीर आहेत आणि त्यांची उत्तरे मिळणे गरजेचे आहे. या द्वेषपूर्ण कटामागे कोण आहे? हरियाणाच्या मुलीच्या आणि देशाच्या पाठीत खंजीर खुपसणारा कोण? या द्वेषपूर्ण कटामागे कोण आहे? विनेश फोगटचा विजय पचवू न शकलेली व्यक्ती कोण? कोणाचा चेहरा वाचवण्याचा प्रयत्न झाला? सर्व काही उघड होईल.

कुस्तीपटू विनेश फोगाटच्या अपात्रतेबाबत सुरजेवाला म्हणाले की, 42 बाउटमध्ये न हरलेल्या जपानी महिला कुस्तीपटूला आमची मुलगी विनेश फोगटने काही क्षणातच हरवले. तेही 2023 मध्ये जेव्हा ती दिल्लीच्या रस्त्यावर न्यायासाठी याचना करत होती. यानंतरही राष्ट्रध्वज उंचावला. पण देशाचे पंतप्रधान म्हणत आहेत, आता परत या. दुसरा कोणी पंतप्रधान असता तर त्यांनी क्रीडामंत्र्यांना आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेकडे पाठवून निषेध नोंदवला असता. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाली असती तर विनेशला न्याय मिळाला असता, असे खासदार रणदीप सुरजेवाला यांनी सांगितले. हा प्रश्न फक्त विनेशचा नाही तर देशाच्या तिरंग्यासाठी जीव धोक्यात घालणाऱ्या प्रत्येक खेळाडूचा आहे. मात्र, आज मोदी सरकारने या सर्वांची निराशा केली आहे, असेही सूरजेवाला म्हणाले.