डोंबिवलीत भरधाव टेम्पोने मुलाला चिरडले, चालकाला अटक

भरधाव टेम्पोने दोन मुलांना धडक दिल्याची घटना आज रात्री घडली. 14 वर्षीय बुद्धशल खंदारे या मुलाचा जागीच मृत्यू झाला असून वैभव शेंडगे (15) हा गंभीर जखमी झाला. मानपाडा पोलिसांनी तत्काळ कारवाई करत टेम्पो चालकाला अटक केली. टेम्पोचा चालक दारूच्या नशेत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

बुद्धशल खंदारे हा सोनारपाडा येथील रहिवासी होता. वैभव शेंडगे जखमी अवस्थेत रुग्णालयात उपचार घेत आहे. दोघेही ग्रीन इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी असून क्लासमधून घरी परतत असताना ही दुर्घटना घडली. प्राथमिक तपासात टेम्पो चालकाने दारूच्या नशेत गाडी चालवली होती का याचा तपास सुरू आहे.

सुभाष भोईर यांनी केली विचारपूस

या अपघाताची माहिती मिळताच शिवसेनेचे उमेदवार सुभाष भोईर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आणि जखमी मुलाच्या तब्येतीची विचारपूस केली. मानपाडा पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून अधिक तपास सुरू आहे.