मधुमेही विद्यार्थ्यांसाठी विशेष सुविधा

टाईप 1 मधुमेहाने ग्रासलेल्या दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेदरम्यान अधिकच्या विशेष सुविधा देण्याचा निर्णय राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतला आहे. परीक्षा काळात मधुमेह आजार असलेल्या विद्यार्थ्यांना आरोग्यविषयक अतिरिक्त सवलती दिली जाणार आहे.

राज्य शिक्षण मंडळाने याविषयीच्या सूचना जारी केल्या असून या सवलतींपासून विद्यार्थी वंचित राहणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन सर्व मुख्याध्यापक आणि प्राचार्यांना करण्यात आले आहे. तसेच मधुमेह आजार असलेल्या दहावी, बारावीच्या दिव्यांग विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी अधिकच्या सोयी सवलतींचा लाभ घेता यावा म्हणून शाळांनी अशा विद्यार्थ्यांचे प्रस्ताव विभागीय शिक्षण मंडळाकडे सादर करायचे आहेत.

या आहेत सवलती…
सकाळ आणि दुपार सत्रात खाद्यपदार्थांची आवश्यकता भासल्यास खाद्यपदार्थ वर्गखोलीत खाण्याची परवानगी. मधुमेह असलेल्या विद्यार्थ्यांना डॉक्टरांनी खेळात सहभागी होण्याची परवानगी दिली असल्यास तसे प्रमाणपत्र. परीक्षेवेळी मधुमेहाची औषधे सोबत ठेवणे.विद्यार्थ्यांनी सोबत आणलेली औषधे, फळे, पिण्याचे पाणी, बिस्किटे, शेंगदाणे, सुका मेवा परीक्षेवेळी शिक्षकाकडे ठेवण्यात याव्यात. ग्लुकोमीटर, ग्लुकोज चाचणी पट्टी परीक्षेदरम्यान परीक्षागृहात नेता येणार. इन्सुलिन पंप वापरणाऱया विद्यार्थ्यांना परीक्षेदरम्यान हे उपकरण वापरता येणार. ग्लुकोज मॉनिटरिंगसाठी स्मार्ट पह्न वापरण्यात येत असल्यास तो पह्न परीक्षा निरीक्षकांकडे ठेवता येईल.