नौदल अधिकाऱ्याची फसवणूकप्रकरणी एकाला अटक 

स्टॉक ट्रेडिंगच्या नावाखाली नौदल अधिकाऱ्याची 22 लाख रुपयांची फसवणूकप्रकरणी एकाला दक्षिण सायबर पोलिसांनी अटक केली. ममन रहमान मुन्शी असे त्याचे नाव आहे. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले होते.

तक्रारदार हे हिंदुस्थानी नौदलात कार्यरत आहेत. मे महिन्यात ते त्याच्या कार्यालयात काम करत असताना त्यांना एक जाहिरात दिसली. त्यानंतर त्यांना एका व्हॉट्सअॅप ग्रुपवर जोडले गेले. त्या ग्रुपमध्ये माहिती एक जण शेअर करायचा. त्याने तो एका कंपनीत काम करत असल्याचे भासवले. त्यानंतर त्याने तक्रारदार यांना एक बनावट लिंक पाठवली. त्या लिंकवरून अॅप डाऊनलोड करण्यास सांगितले.

नफा जास्त मिळेल असे सांगून त्यांना 22 लाख 91 हजार रुपयांची गुंतवणूक करण्यास भाग पाडले. गुंतवणूक केल्यावर त्यांना त्या अॅपवर नफा दिसत होता. तो नफा काढण्याचा प्रयत्न करत होते, मात्र तो निघत नव्हता. त्याबाबत त्याने ग्रुप एडमिनला विचारणा केली. त्याने त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्याने दक्षिण सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद केला. वरिष्ठ निरीक्षक नंदपुमार गोपाळे यांच्या पथकातील अधिकाऱ्यांनी तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांना बँक खात्याची माहिती मिळाली. फसवणुकीपैकी काही पैसे विविध बँक खात्यांत जमा झाले होते. ते बँक खाते ममन याने दिल्याचे समोर आले. ममन हा जुहू परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी जुहू येथे सापळा रचून ममनला ताब्यात घेतले. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले होते. त्याच्या इतर साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत.