सर्वोच्च न्यायालयाचे निकाल आता मराठीत, सरन्यायाधीशांची महत्त्वपूर्ण घोषणा

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर न्यायदेवतेच्या मंदिरातही मराठी भाषेची शान वाढणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायनिवाडे मराठी आणि कोकणी भाषेत उपलब्ध केले जातील. देशातील सर्व स्थानिक भाषांमध्ये निकालपत्रे अनुवादित केली जातील, अशी महत्त्वपूर्ण घोषणा सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड यांनी शनिवारी केली.

गोव्यात मेरशी जिल्हा व सत्र न्यायालयाच्या संकुलाचे उद्घाटन करण्यासाठी सरन्यायाधीश आले होते. उद्घाटन सोहळय़ानंतर त्यांनी राजभवनमध्ये पुस्तक प्रकाशन समारंभाला उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी न्यायनिवाडय़ांच्या अनुवादाबाबत घोषणा केली. देशातील न्यायालये लोकांसाठी आहेत. सर्वसामान्य नागरिक न्यायासाठी कोर्टाची पायरी चढतात. त्यांना न्याय मिळायला हवा. त्यांना न्याय देत जाहीर केलेली निकालपत्रे सामान्य पक्षकारांना समजली पाहिजेत. याच अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाचे न्यायनिवाडे मराठी व कोकणी भाषेतही उपलब्ध केले जातील, असे डॉ. चंद्रचूड यांनी जाहीर केले.

37 हजार निवाडे हिंदीमध्ये अनुवादित इंग्रजी भाषा समजणे सामान्य पक्षकारांना अवघड जाते. ही अडचण लक्षात घेऊन देशातील स्थानिक भाषांमध्ये निकालपत्रे अनुवादित केली जात असल्याचे सरन्यायाधीशांनी स्पष्ट केले. आतापर्यंत सर्वोच्च न्यायालयाचे तब्बल 37 हजार निवाडे हिंदीमध्ये अनुवादित केले आहेत. स्थानिक भाषांमध्ये न्यायनिवाडे अनुवादित करून एक नवीन संदेश देत आहोत, असे त्यांनी नमूद केले.

कोर्टाने संसदेतील विरोधी पक्षाची जागा घेऊ नये!

सर्वोच्च न्यायालयाने लोकन्यायालय म्हणून भूमिका बजावावी. भविष्यात तशीच भूमिका कायम ठेवली पाहिजे. मात्र न्यायालयांनी संसदेतील विरोधी पक्षाची जागा घेऊ नये. सर्वोच्च न्यायालयाने मागील 75 वर्षांत न्यायदानाचा चांगला आदर्श निर्माण केला आहे. हा आदर्श गमावता कामा नये, असे मत सरन्यायाधीश डॉ. चंद्रचूड यांनी दक्षिण गोव्यात सुप्रीम कोर्ट अॅडव्होकेट्स ऑन रेकॉर्ड असोसिएशनच्या परिषदेत बोलताना व्यक्त केले.