हिंदी महासागरात बांगलादेशी जहाजाचे अपहरण; हिंदुस्थानची युद्धनौका मदतीसाठी रवाना

हिंदी महासागरात समुद्री चाच्यांचा धोका दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आता पुन्हा एकदा येथे एका मालवाहू जहाजाचे अपहरण करण्यात आले आहे. मोझांबिकमधील मापुटो बंदरातून UAE मधील अल हमरिया बंदराकडे जाणाऱ्या एम व्ही अब्दुल्ला या बांगलादेशी मालवाहू बोटीचे समुद्री चाच्यांनी अपहरण केले आहे.

एम व्ही अब्दुल्ला हे जहाज एस आर शिपिंग या बांगलादेशी कंपनीचे आहे. मिळालेल्या माहितीनुसार या जहाजामध्ये एकूण 23 सदस्य होते. तसेच या जहाजात सुमारे 58 हजार टन कोळसा असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. समुद्री चाच्यांनी जहाजाचे अपहरण केल्यानंतर त्यांनी जहाजामधील क्रू मेंबर्सना ओलिस ठेवले आहे.

बांगलादेश मर्चंट मरीन ऑफिसर्स असोसिएशनचे अध्यक्ष कॅप्टन अनम चौधरी यांनी सांगितले की, ज्यावेळी केबीन क्रू मेंबर्सना डांबून ठेवलं त्यावेळी त्यांनी हुशारीने मदतीसाठी व्हॉट्सॲपवर संदेश पाठवला होता. यामुळे आम्हाला यासंदर्भात माहिती मिळू शकली. त्यामुळे एम. व्ही. अब्दुल्ला जहाज वाचवण्यासाठी हिंदुस्थानी नौदलाने तातडीने युद्धनौका आणि एलआरएमपीची (सागरी गस्ती विमान) विमाने तैनात केली. दरम्यान, 12 मार्च रोजी विमानाने एम. व्ही. अब्दुल्ला या अपहरण झालेल्या जहाजाचा शोध घेतला. परंतु त्यावेळी जहाजावर असलेल्या क्रू मेंबरसोबत कोणत्याही प्रकारचा संवाद होऊ शकला नाही. यानंतर 14 मार्च रोजी अपहरण करण्यात आलेले जहाज हे बांगलादेशचे असल्याचे समोर आले. यानंतर केबीन क्रू सुरक्षित आहे की नाही? याची खातरजमा करण्यात आली. संपूर्ण केबीन क्रू सुरक्षित आहे. पण अद्याप त्यांच्याशी संपर्क झालेला नाही. हा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात आहे.