सोलापूर विद्यापीठाची मार्चच्या तिसऱ्या आठवड्यात सत्र परीक्षा

 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची पुढील सत्र परीक्षा मार्च महिन्याच्या तिसऱया आठवडय़ापासून सुरू होणार आहे. त्यासंबंधीचे वेळापत्रक परीक्षा विभागाने तयार केले असून, अभ्यास मंडळाच्या पुढील आठवडय़ातील बैठकीत त्याकर शिक्कामोर्तब होणार आहे.

कला, वाणिज्य, विज्ञान, सामाजिक शास्त्र, एमएसडब्ल्यू या अभ्यासक्रमाचे द्वितीय सत्र 14 डिसेंबरपासून सुरू झाले आहे. विधी व शिक्षणशास्त्र (बी.एड., बी.पी.एड, एम.एड., एम.पी.एड, एम.ए.एज्युकेशन) अभ्यासक्रमाचेही सत्र 14 डिसेंबरपासून सुरू झाले आहे. या अभ्यासक्रमांची परीक्षा साधारणतः 14 मार्चपासून सुरू होणार आहे. अभियांत्रिकी, तांत्रिक, आर्किटेक्चर, फार्मसी, व्यवस्थापन अभ्यासक्रम एमबीए या महाविद्यालयांचे सत्र 1 जानेवारीपासून सुरू झाले आहे. त्यामुळे या अभ्यासक्रमांची परीक्षा एप्रिलमध्ये सुरू होईल.

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निकषांनुसार दोन सत्रांत 90 दिवसांचे अंतर आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर विद्यापीठाने कोणत्या अभ्यासक्रमाचे सत्र कधी सुरू झाले व कधी संपले, याबद्दलचे पत्र सर्व संलग्नित महाविद्यालयांना पाठविले आहे. त्यानुसार परीक्षांचे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. दरम्यान, सत्राची सुरुवात व समाप्तीच्या तारखांमध्ये महाविद्यालयांना परस्पर बदल करता येणार नाही, असेही विद्यापीठाने पत्राद्वारे स्पष्ट केले आहे.

फोटोकॉपीसाठी 15 दिवसांची मुदत

– बी.ए., बी.कॉम., बीबीए, बीएससी, बीसीए या पारंपरिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकांची फोटोकॉपी संबंधित महाविद्यालयात ऑफलाइन अर्ज करावे लागणार आहेत. फोटोकॉपीकरिता निकालानंतर 15 दिवसांपर्यंत मुदत असते. काही अभ्यासक्रमांसाठी 9 जानेवारीपर्यंत, तर काहींसाठी 20 जानेवारीपर्यंत मुदत आहे. 20 नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या परीक्षांच्या फोटोकॉपीसाठी ऑफलाइन अर्ज, तर 18 डिसेंबरपासून सुरू झालेल्या पदव्युत्तर पदवी, अभियांत्रिकी आणि विधी व शिक्षणशास्त्र अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांचे ऑनक्रिन मूल्यमापन झाले आहे. त्यांना मात्र फोटोकॉपीसाठी ऑनलाइन अर्ज करावे लागणार आहेत. अर्जासाठी प्रत्येक विषयाला 200 रुपयांचे शुल्क आहे. एका सत्र परीक्षेतील जास्तीत जास्त दोन विषयांचीच फोटोकॉपी मिळते. उत्तरपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी फोटोकॉपी मिळाल्यानंतर सात दिवसांत अर्ज करणे बंधनकारक आहे. त्यासाठी प्रत्येक विषयासाठी 500 रुपयांचे शुल्क आहे.