नीरा उजवा कालव्याच्या पाण्याने तिसंगी तलाव भरणार

पंढरपूर तालुक्यात म्हणावा तसा पाऊस झालेला नाही. पिकांना पाण्याची कमतरता जाणवत आहे. अधूनमधून येणाऱया पावसावर पिके तग धरून आहेत. भविष्यात पाणीटंचाई जाणवू नये म्हणून नीरा उजवा कालव्याच्या पाण्याने तिसंगी तलाव भरण्यात येणार आहे. त्यामुळे सध्या कालव्याद्वारे तलावात 300 क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे.

नीरा खोऱयातील भाटघर, वीर ही धरणे पूर्ण क्षमतेने भरल्याने त्याचा फायदा पंढरपूर तालुक्यातील 9 गावांसाठी उपयुक्त असलेल्या तिसंगी सोनके तलाव मध्यम प्रकल्प भरून घेण्यास होत आहे. नीरा उजवा कालवा पाण्यामुळे तलावात सध्या 15 फूट इतका पाणीसाठा झाला आहे. तलाव पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी आणखी एक महिन्याचा कालावधी लागणार आहे.

भाटघर, वीर धरण 100 टक्के भरल्यानंतर वाहून जाणाऱया पाण्यातून तलाव भरून घेण्यात येतो. गतवर्षी नीरा उजवा कालवा लाभक्षेत्रात पावसाने ओढ दिल्याने उभ्या पिकांना पाणी देण्यात आले होते. शिवाय वीर धरणातही पाणीसाठा कमी होता. त्यामुळे तिसंगी सोनके तलाव जेमतेम 25 ते 30 टक्के भरला होता. त्यामुळे तलाव लाभक्षेत्रातील पिके करपून गेली होती. पिण्याचे पाणी तसेच चाऱयाचा प्रश्न निर्माण झाला होता. पाण्यासाठी शेतकऱयांनी आंदोलन केले होते. लोकसभा निवडणुकीदरम्यान कालवा पाण्याचा विषय गाजला होता.

यंदा पाऊस चांगला झाल्याने भाटघर व वीर धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. त्यामुळे 26 जुलैपासून नीरा उजवा कालव्यातून तलावात पाणी सुरू करण्यात आले आहे. गेल्या पंधरा दिवसांत तलावात 30 टक्के इतका पाणीसाठा झाला आहे. 300 क्युसेकने पाणी सुरू असून, तलाव पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी आणखी एक महिन्याचा कालावधी लागणार आहे. तलाव 100 टक्के भरल्याशिवाय नीरा उजवा कालव्यातून सोडण्यात येत असलेले पाणी बंद करू नये, अशी मागणी तलाव लाभक्षेत्रातील 9 गावांतील शेतकऱयांकडून पाटबंधारे विभागाकडे करण्यात आली आहे.

तिसंगी तलावावर 9 गावांतील 5 हजार हेक्टर क्षेत्र अवलंबून

n तिसंगी सोनके तलावात सध्या 300 क्युसेकने पाणी सोडण्यात आले आहे. तिसंगी सोनके तलावामुळे परिसरातील तिसंगी, सोनके, पळशी, उपरी, भंडीशेगाव, वाखरी, गादेगाव, खेड भाळवणी, शेळवे आदी 9 गावांतील सुमारे 5 हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे.