काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते-पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे व खासदार प्रणिती शिंदे यांच्यावर टीका करीत ‘सोलापुरात शिंदेमय काँग्रेस’ असा टोला लगावत निवडणुकीत खासदार प्रणिती शिंदेंमुळे काँग्रेसला जिल्ह्यात भोपळा मिळाला, असा हल्लाबोल केला.
यावर काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी धवलसिंह मोहिते यांनाही टोला हाणला असून, ‘राजकीय स्वार्थासाठी अनेक पक्ष फिरून आलेले धवलसिंह हे सध्या भाजपाच्या कळपात असून, त्यांनी शिंदेंविषयी बोलू नये,’ असे म्हटले आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते-पाटील यांनी नुकतेच माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे व खासदार प्रणिती शिंदे यांच्यावर पक्षविरोधी भूमिकेची टीका करीत मनमानीपणाचा आरोप केला आहे.
प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सोलापूर दौऱ्यावर असताना धवलसिंह मोहिते-पाटील यांनी पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र पाठवून जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. यात त्यांनी विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देताना विश्वासात घेतले नाही. दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार अमर पाटील यांचा प्रचार करण्याऐवजी सुशीलकुमार शिंदे व प्रणिती शिंदे यांनी अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांना ऐनवेळी पाठिंबा देत पक्षविरोधी काम केले. अशा धोरणामुळेच पक्षाला एकही जागा मिळाली नाही. सध्या सोलापुरात शिंदेमय काँग्रेस असून, अशीच अवस्था यापुढील काळात महापालिका, नगरपरिषद, जिल्हापरिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत होईल, असा आरोप धवलसिंह यांनी केला आहे.
भाजपाच्या कळपात शिरलेल्यांनी बोलू नये – नरोटे
या राजीनामा नाट्यावर बोलताना काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे म्हणाले, धवलसिंह मोहिते-पाटील हे राजकीय स्वार्थासाठी अनेक पक्ष फिरून आले आहेत. जिकडे सत्ता असते तिकडे जातात. अध्यक्ष पदावर असताना ते काँग्रेस भवनकडे फिरकले नाहीत. लोकसभा निवडणुकीवेळी तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून महाविकास आघाडीच्या विरोधात काम केले. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत भाजपाचे उमेदवार राम सातपुते यांना पाठिंबा दिला. आता ते भाजपाच्या कळपात शिरणार असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे धवलसिंह यांनी पक्षनिष्ठा आणि शिंदे यांच्याविषयी बोलू नये, असे म्हणत टोला लगावला आहे.