अनुबंध – सोळा शृंगार

>> लता गुठे

स्त्रियांचे सोळा शृंगार हे पुराणकाळापासून चालत आलेली हिंदुस्थानी संस्कृती आहे. अनेक पुरातन लेण्यांमध्ये जेव्हा आपण फिरायला जातो त्या वेळी तिथल्या मूर्तींच्या अंगावरील दागिने पाहिले की, आश्चर्य वाटते. राजघराण्यातील स्त्रियांचे फोटो पाहताना त्यांच्या अंगावरील सोळा शृंगार पाहून थक्क व्हायला होते. पुरुष असो वा स्त्राr, त्यांच्या सौंदर्याची प्रशंसा करावी तितकी थोडी. राजघराण्यातीलच नाही, तर सर्वसामान्य घरातील स्त्रियाही लग्न-समारंभ किंवा सणöउत्सवांमध्ये सोळा शृंगार करताना दिसतात.

सोळा शृंगाराची परंपरा वैदिक काळापासून आजच्या काळापर्यंत चालत आली आहे आणि पुढेही चालत राहणार आहे. यामागे फक्त स्त्रियांनी सुंदर दिसावे एवढाच उद्देश नसून शास्त्राrय दृष्टिकोनातून पाहिल्यास आरोग्याच्या दृष्टीनेही त्याचे महत्त्व असल्याचे दिसून येते. हे सोळा शृंगार आहेत… 1) स्नान 2) बिंदी (कपाळावर टिकली किंवा कुंकू) 3) सिंदूर (भांगातील) 4) डोळ्यात काजळ 5) पैंजण 6) गजरा 7) मांग टीका, 8) नथ, 9) कानातले 10) मंगळसूत्र 11) बाजूबंद 12) बांगडय़ा 13) अंगठी 14) कंबरपट्टा 15) जोडवी 16) मेंदी.

यापैकी काही महत्त्वाच्या शृंगारांचा उल्लेख आणि मग त्या मागचे महत्त्व काय आहे ते पाहू या. बहुतेक हिंदुस्थानी स्त्रियांना शृंगार करायला आवडते. वैश्विक दृष्टिकोनातून त्यावर नजर टाकताना रामायण -महाभारताच्या काळापासून पाहिले तर त्या काळी भलेही मेकअपची साधने उपलब्ध नव्हती. तरीही नैसर्गिक गोष्टींपासून ती उपलब्ध होत होती.राजघराण्यातली राजकुमार-राजकन्या सुवासिक उटण्याने आंघोळ करत. यामध्ये गुलाब पाकळ्या, चंदन, दूध, हळद अशा विविध गोष्टींपासून उटणे तयार केले जात. ते लावून आंघोळ केल्यास शरीरातील उष्णता कमी होऊन मनाला प्रसन्न वाटते. सोळा शृंगारांपैकी पहिला शृंगार आहे स्नान. सुगंधी तेलाने आधी मालीश करून नंतर उटणे लावून आंघोळ केल्याने थकवा निघून जातो व ऊर्जा मिळते. त्याबरोबरच नैसर्गिक सुगंधाने शरीर आणि मन उल्हासित होते. वातावरण निर्मिती छान होते. ती एक सुखाची अनुभूती, आनंद देणारी असल्याने अशा पद्धतीने स्नानाचे महत्त्व सोळा शृंगारात आलेले आहे. आपल्याकडे अजूनही काही समाजांमध्ये नवरा-नवरीला लग्नाआधी आंघोळ घालण्याची पद्धत आहे. यामागे हेच कारण असावे.

पूर्वीपासून दोन भुवयांच्या मध्ये स्त्री आणि पुरुष दोघेही गंध वा कुंकू लावत आले आहेत. कुंकू हे लाल रंगाचे असते. दोन भुवयांच्या मध्ये आज्ञाचक्र असल्यामुळे त्या ठिकाणी ओले कुंकू बोटाने लावताना तिथे बोट फिरविले जाते. त्यामुळे आज्ञाचक्राला स्पर्श होतो. दुसरे कारण म्हणजे गंध किंवा टिकली लावल्याने स्त्रियांचा चेहरा सुंदर दिसतो. शरीरातील उष्णता कमी होते. वारकरी संप्रदायामध्ये चंदन उगाळून त्याचा गंध करून वारकरी ते दोन भुवयांमध्ये लावतात. कुठल्याही देवाचा फोटो पाहिला (राम, कृष्ण, विठ्ठल…) तर सर्वांच्या कपाळावर विशिष्ट पद्धतीने गंध लावलेला दिसतो. गंध लावण्याची पद्धत ही आजची नाही, तर युगान्युगापासूनची आहे यामागे अनेक शास्त्रीय कारणे आहेत. कुंकवात लाल रंगाचे लेड ऑक्साईड असल्यामुळे ते मेंदूतील ग्लानी दूर करते.

पिढ्यान्पिढ्या आपल्याकडे बाळाच्या डोळ्यांमध्ये काजळ घालण्याची प्रथा आहे. स्त्रियाही डोळ्यांचे सौंदर्य वाढण्यासाठी काजळ घालतात. यामागे कोणाची नजर लागू नये हा हेतू असतो. यामागचे शास्त्रीय कारण काय आहे याचा शोध घेताना एक नेत्र तज्ञ डॉ. पवार यांचा लेख वाचायला मिळाला. त्यामध्ये ते म्हणतात, “काजळ हे डोळ्यांचं औषध म्हणता येऊ शकतं. डोळ्यांच्या वरच्या बाह्य आवरणामध्ये ज्या पेशी असतात, त्या पेशींमध्ये झालेला मलसंचय या काजळामुळे बाहेर येण्यास मदत होते. डोळे स्वच्छ राहतात आणि तेजस्वी दिसतात.’’ सोळा शृंगारांतील काजळ हा स्त्रीच्या शृंगाराचा भाग आहे. आपल्याकडे अनेक गीतांमधून साजशृंगाराचे वर्णन आढळते. गवळणी, भारूड, विराण्या, लावणी… यातूनही शृंगार व्यक्त झाला आहे.

जाई, जुई, चाफा, चमेली, मोगरा… अशा सुगंधी फुलांचे गजरे बाजारात खूप मिळतात. देशाच्या प्रत्येक प्रांतामध्ये फुलांच्या गजऱयाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. देवीची ओटी भरतानाही त्यामध्ये गजरा हवाच. पांढऱयाशुभ्र मोगऱयाच्या फुलांचा गजरा केसात माळला की, तन-मन सुगंधित होऊन जाते. त्याचबरोबर आजूबाजूचा परिसर गजऱयाच्या सुगंधाने दरवळून जातो. काही ठिकाणी लग्न झालेल्या स्त्रिया रोज केसात गजरा किंवा फुले माळतात. ही पद्धत कोकण आणि दक्षिणेत खूप प्रमाणात पाहायला मिळते. जेव्हा पत्नी शृंगार करायला आरशासमोर उभी राहते तेव्हा पतिराज तिच्या केसांमध्ये गजरा माळतो तेव्हा तिच्या चेहऱयावरचे भाव बदलून जातात. शृंगाराचे हे कॉम्बिनेशन अतिशय देखणे आहे. फुलांच्या नैसर्गिक सुगंधामुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. मनाची मरगळ कमी होऊन उत्साह वाढतो.

हिंदुस्थानातील वेगवेगळ्या प्रांतांमध्ये अनेक प्रकारच्या नथी पाहायला मिळतात. काही गोल, काही वाकडय़ा, सोन्याच्या, मोत्याच्या, हिऱयाच्या… अशा वेगवेगळ्या प्रकारच्या नथी आपण पाहतो. नथ ही सौभाग्याचे प्रतीक समजली जाते. दागिन्यांमध्ये नथीला महत्त्वाचे स्थान आहे. मंगळसूत्र आणि गळ्यातील विविध दागिन्यांशिवाय शृंगार अधुरा वाटतो. मंगळसूत्रामध्ये फक्त काळे मणी आणि सोन्याच्या वाटय़ाच नसून त्यामागे पती-पत्नीच्या नात्यातील विश्वास, श्रद्धा असते. हिंदू धर्मामध्ये लग्नात मंगळसूत्र घालणे हा एक संस्कार मानला जातो.

झुमके, झुब्बे हा कानातला दागिना आहे. वेगवेगळ्या प्रकारचे झुमके, लहानमोठ्या आकाराचे, मोत्याचे, सोन्याचे, कुंदनजडित झुमके चेहऱ्याची शोभा वाढवतात.दंडावर घातले जाणाऱ्या बाजूबंदाचे वैशिष्ट्य असे की, तो लक्ष जास्त वेधून घेतो. बाजूबंद हा दागिना घट्ट असल्यामुळे बाजूवर दबाव निर्माण होतो आणि रक्त पुरवठा सुरळीत होतो. बाजूबंद हा दागिना डाव्या दंडावर घालण्याची प्रथा आहे. आपल्याकडे लग्नामध्ये नवरीला चुडा भरणे हा संस्कार मानला जातो. बांगडय़ांशिवाय कोणताही शृंगार अपूर्ण आहे. काचेच्या बांगड्या हे सौभाग्याचे प्रतीक मानले जाते. सोन्याचांदीच्या बांगडय़ा घातल्यामुळे त्या सोन्याचांदीच्या धातूंचे सकारात्मक परिणाम शरीरावर होतात. सोन्याच्या बांगड्यांमध्ये बांगड्या, पाटल्या, गोठ असे अनेक प्रकार पाहायला मिळतात. सोळा शृंगारांपैकी असलेला मेंदी हा शृंगार लग्न सोहळे, सण-उत्सवाच्या निमित्ताने स्त्रिया आवर्जून मेंदी लावतात. मेंदीमध्ये थंडावा असतो व त्याने शरीरातली उष्णता कमी होते. हातावरची मेंदी किती रंगते त्यावर नवऱयाचे प्रेम किती आहे हे आजमावले जाते. मेंदी सुंदर दिसते, त्याबरोबरच ती नवीन नातीही जोडते.

सर्व शरीराचे पॉइंट तळहातावर आणि बोटांवर असल्यामुळे अंगठी घातल्याने ते पॉइंट दाबले जातात आणि शरीराला रक्तपुरवठा चांगला होण्यासाठी त्याचा फायदा होतो. वेगवेगळी रत्ने घातलेल्या अंगठ्या शक्यतो सोन्याच्या असतात. त्याचाही शरीरावर सकारात्मक परिणाम होतो. पैंजण हाही पारंपरिक दागिना आहे. जेव्हा लहान मुलगी घरात पैंजण घालून फिरते, त्या वेळी चैतन्याचा अनुभव येतो. पैंजण शक्यतो चांदीचेच असतात कारण चांदी हा धातू थंड समजला जातो. पायात पैंजण घातल्यामुळे शरीरातील उष्णता कमी होते. घरातल्या स्त्रीच्या पैंजणाचा रुणझुण आवाज कानाला हवाहवासा वाटतो. लग्न झालेल्या स्त्रिया चांदीची जोडवी घालतात. सोन्याचांदीचा वापर आयुर्वेदात केला जात असल्याचे आपण जाणतो. शरीरातील रोगप्रतिकारशक्ती यामुळे चांगली होते. स्त्रियांचे सोळा शृंगार हे सुखी, आनंदी, समृद्ध घराचे प्रतीक आहे.

[email protected]