निवडणूक आयोग बॅलेट पेपरवर निवडणुका घेणार असेल, तर उत्तम जानकर यांच्यासह मी आणि आम्ही खूप लोक राजीनामा द्यायला तयार आहोत, असं वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं आहे. मारकडवाडी येथे गावकऱ्यांशी संवाद साधताना ते असं म्हणाले आहेत. दोन दिवसाआधीच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी येथे भेट दिली होती. यानंतर आज नाना पटोले यांनीही मारकडवाडी येथे जात गावकऱ्यांशी संवाद साधला.
यावेळी बोलता नाना पटोले म्हणाले आहेत की, येथे काही लोक आले आणि राजीनामे द्यावेत म्हणून बडबडून गेले. निवडणूक आयोग ही त्यांची कठपुतली आहे, अशी टीका त्यांनी केली. ते म्हणाले, निवडणूक आयोगाने सांगावे की, पुढच्या निवडणुका बॅलेटवर घेऊ. यानंतर उत्तम जानकर यांच्यासह मी आणि आम्ही खूप लोक राजीनामा द्यायला तयार आहोत.”
नाना पटोले म्हणाले आहेत की, ”निवडणूक आयोगाला मी मागणी केली आहे की, कुठे – कुठे मतदान झाले, याचे फुटेज आम्हाला द्यावेत. मात्र अजूनही निवडणूक आयोगाने आम्हला फुटेज दिलेले नाहीत.” ते पुढे म्हणाले, ”तुम्ही ज्या उमेदवाराला मत दिले, ते त्या उमेदवाराला गेले नाही, ही शंका तुमच्या मनात आली. त्यानंतर जनतेने आवाज उचलला. हा आवाज कोणत्याही राजकीय पक्षाने उचललेला नाही.”